समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:40 AM2018-02-16T00:40:13+5:302018-02-16T00:40:31+5:30

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे

Incomplete the panchnama for lack of coordination | समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

googlenewsNext

जालना : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचा-यांमधील समन्वयाच्या अभावामुळे संयुक्त पंचनाम्याचे काम गुरुवारी चौथ्या दिवशीही पूर्ण झाले नाही.
जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे २०८ गावांमधील सुमारे ३८ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा, तूर या हंगामी पिकांसह द्राक्ष डाळिंब आणि मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता जालना, मंठा आणि जाफराबाद तालुक्यात अधिक आहे. जालना तालुक्यातील ६२ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. अद्याप केवळ दहा गावांमधील पंचनामे पूर्ण झाले आहे. बाधित सर्व गावांमधील पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल प्राप्त झाला नसल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त ४५ गावांपैकी तलाठी उपलब्ध असलेल्या २३ गावांमधील पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. अशीच स्थिती जाफराबाद तालुक्यातही आहे. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा, देळेगव्हाण, पोखरी, सातेफळ, बुटखेडा इ. गावांमध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले. फळबागा व शेडनेटच्या नुकसानीचे पंचनामे अगोदर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे तहसीलदार जे.डी.वळवी यांनी सांगितले. अन्य पिकांच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यात अधिका-यांमधील असमन्वयामुळे पंचनाम्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. तहसीलदार रजेवर असून, तालुका कृषी अधिकारी एस. आर.पोटे सोमवारपासून कार्यालयातच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतात येऊन पंचनामे करतील याची दोन दिवसांपासून वाट पाहत आहोत, मात्र अद्याप एकही अधिकारी व कर्मचारी शेतात फिरकला नसल्याचे मच्छिंद्र चिंचोली येथील शेतकरी नंदकिशोर घोगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे अद्याप अपूर्णच आहेत.
--------
पंचनामे तातडीने पूर्ण करावेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभाती माणिकराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
----------

गारपीट ग्रस्त भागांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल.
-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.
--------------

Web Title: Incomplete the panchnama for lack of coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.