रजेवर गेलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याने दिला अपूर्ण पदभार ; कामाचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:46+5:302021-03-04T04:57:46+5:30
येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे हे १८ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. सध्या जे.एम.खैरे यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. ...
येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे हे १८ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. सध्या जे.एम.खैरे यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. परंतु, शिंदे यांनी मुख्य दस्तावेज असलेल्या कपाटाची चावी दिली नसून, आर्थिक व्यवहारासाठी सह्यांचे नमुने बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या कामाला अडकाठी निर्माण झाली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीला उपाययोजना राबविण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. येथे प्लॉटिंग खरेदी -विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. परंतु, ग्रामविकास अधिकारी शिंदे यांनी मुख्य दस्तावेज कुलूप बंद ठेवल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. २७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, नियोजित कामाची अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. मध्यंतरी गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपूर्ण पदभार द्या नसता रूजू व्हा, अशी सूचना केली होती. तरी शिंदे यांनी पदभारही दिला नाही व ते हजरही झाले नाहीत. शिंदे यांच्या आडमुठी धोरणामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. तर सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.