आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:38+5:302021-03-01T04:34:38+5:30
मंठा शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मंठा : तालुक्यात गेल्या काही ...
मंठा शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मंठा येथील आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागली.
गतवर्षात कोरोना महामारीमुळे सात ते आठ महिने आठवडा बाजार बंद होता. त्यावेळी भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. बहुतांश शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला. त्यामुळे भाजीपाल्याच्या लागवडीत मोठी घट झाली. परिणामी, भाजीपाल्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले होते. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवहार सुरळीत झाले होते. त्यातच विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. दरही स्थिर झाले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लागवड केलेला भाजीपाला कुठे विकावा, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आठवडा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना शहरातील रस्त्यावर बसून भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे.
शहरात कोरोनाच्या नियमांचा फज्जा
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने आठवडा बाजार बंद केला असला, तरी शहरात गर्दीच्या ठिकाणी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलीस तसेच नगर पंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
===Photopath===
280221\28jan_9_28022021_15.jpg
===Caption===
मंठा शहरात शेतकर्यांना रस्त्यावरच बसून भाजीपाला विकावा लागत आहे.