रोहयोवरील मजूर संख्येत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:47 AM2019-01-26T00:47:14+5:302019-01-26T00:47:46+5:30
वसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाने दिलेली ओढ व तीव्र पाणीटंचाईमुळे शेतातील कामे थांबली असतानाच, आता मनरेगांतर्गत (महात्मा गांधी रोजगार हमी) जिल्हाभर सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी एकदाही समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरू असलेल्या मनरेगाच्या कामांवर ३५ हजारांवर मजूर काम करत आहेत.
जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाच्या झळांनी होरपळत असतो. पाणी योजनांच्या माध्यमातून यातील काही भागात पाणी पोहोचले असले तरी, पाचवीला पुजलेला दुष्काळ हटण्याचे नाव घेत नाही. यामुळेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. स्वाभाविकपणे शेतीतील कामे थांबली आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतही दुष्काळाची दाहकता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कामे करण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
रस्त्यांची दुरूस्ती, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड, मुरुमीकरण, विहिरींची कामे, पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी फळबाग लागवड, बांधबंदिस्ती यासह इतर कामे ग्रामपंचायतीकडून सुरू आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे मनरेगाअंतर्गत सुरू आहेत.
या आठवड्यातील मनरेगावर कार्यरत मजुरांचा आढावा घेतला असता, मजुरांच्या संख्येत वाढच होत आहे. जिल्ह्यात २२० कामांवर ९ हजार ३०४ मजूर कार्यरत आहेत. जिल्ह्यात १०२९ कामे सुरू असून यात ग्रामपंचायतीमार्फत २२० कामे सुरू आहेत.