जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या
By शिवाजी कदम | Published: January 2, 2024 11:39 AM2024-01-02T11:39:51+5:302024-01-02T11:40:22+5:30
जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे.
जालना: शाळेत शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षण घ्यावे कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता भाेकरदन तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे शाळा भरवली. जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे घेतले. सकाळी सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी घराकडे मार्गस्थ झाले.
जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे. भोकरदन तालुक्यातील सहा गावातील विद्यार्थी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.
गुणवत्तेवर परिणाम
जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्तेवर परिणाम होत आहे. भोकरदन तालुक्यात देखील शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतांना जिल्हा परिषदेने सुमारे चाळीस शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या करून त्यांना इतर कामे दिलेली आहेत. शिक्षकांना लिपिक,समन्वयक, गट समन्वयक अशा नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.
सोबत आणला डबा
भोकरदन तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे साठ विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कार्यालया सोडायचे नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता. सकाळी नाष्टाकरून हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यानंतर विद्यार्थांनी दुपारी सोबत आणलेल्या डब्यातून जेवण केले. सायंकाळी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली.
सहा शाळांचे विद्यार्थी कार्यालयात
भोकरदन तालुक्यातील सहा गावातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. यात वाघ्रुळ, प्रिंप्री, सावखेडा, कोपर्डी,बरंगळा लोखंडे, बरंगळा साबळे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शाळा भरवली.
शाळांवर शिक्षक नाहीत
जिल्ह्यात शिक्षकांची टंचाई असतांना जिल्हा परिषदेने काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयी काम करण्यासाठी नियुक्त केेले आहे. यामुळे ज्या शाळांवर या शिक्षकांची नियुक्ती आहे, येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवली.
- नवनाथ लोखंडे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन.