केंद्रीय पथकाकडून २६ गावांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:04 AM2019-08-25T01:04:21+5:302019-08-25T01:04:51+5:30
देशभरातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत गुणांकन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने १४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत असून, हे पथक जिल्ह्यातील २६ गावांची पाहाणी करत आहे.
जालना : देशभरातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत गुणांकन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने १४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत असून, हे पथक जिल्ह्यातील २६ गावांची पाहाणी करत आहे. या २६ गावातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये झालेल्या जाणीवजागृतीचीही माहिती घेत आहे.
शहराच्या ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या धर्तीवर ग्रामीण भागात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेत त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र अॅप व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. अभियानात गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची निरीक्षणे; तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेण्यात येणार आहेत. देशभरात हे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड ‘नमुना निवड पध्दतीने’ सर्वेक्षण करणाºया संस्थेकडून करण्यात आली आहे.
ही संस्था ग्रामस्थांना आॅनलाइन व प्रत्यक्ष सहभागी करुन घेऊन गावपातळीवर जाऊन सरपंच, ग्रामसवेक, स्वच्छतागृह, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, व शिक्षकांच्या मुलाखती घेत आहे.
याच्या विविध कामांसाठी गुण असून, एकूण शंभर गुणांसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी ऐनवेळी २६ गावांची निवड करण्यात आली आली आहे. यातील अबंड, भोकरदन व जालना तालुक्यातील काही गावांची पाहणी केंद्राच्या पथकाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात दखल झाले असून, हे पथक २६ गावांची पाहणी करीत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. एकूणच या पाहणीतून शौचालय अनुदान वाटपातील निधीचीही झाडाझडती घेतली जाणार आहे.