काँक्रिटीकरणाची होणार तज्ज्ञांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:44 PM2017-11-26T23:44:53+5:302017-11-26T23:45:10+5:30

राजेश भिसे/जालना : शहरात झालेल्या प्रमुख मार्गांच्या काँक्रिटीकरणाची कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती यंत्राद्वारे तपासणी करणार असल्याची माहिती ...

Inspection by experts will be done for concretization | काँक्रिटीकरणाची होणार तज्ज्ञांकडून तपासणी

काँक्रिटीकरणाची होणार तज्ज्ञांकडून तपासणी

googlenewsNext

राजेश भिसे/जालना : शहरात झालेल्या प्रमुख मार्गांच्या काँक्रिटीकरणाची कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती यंत्राद्वारे तपासणी करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी रविवारी दिली. ‘काँक्रिटीकरणाची वर्षपूर्ती’ ही वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. आगामी पंधरा दिवसांत तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी समितीला दिले आहेत.
जालनेकरांची खड्डेमुक्त रस्त्यांपासून कायमची सुटका करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. विविध प्रमुख मार्गांची काँक्रिटीकरणाची कामे सुरू करण्यात आली. पाच एजन्सीजना हे काम देण्यात आले. मात्र, रस्त्यांचे काँक्रिटीकरण निकषांनुसार झाले नाही. निकृष्ट कामे झाल्याची खदखद नागरिकांच्या मनात होती. जालनेकरांच्या मनातील ही खदखद लोकमतने ‘काँक्रिटीकरणाची वर्षपूर्ती’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून ऐरणीवर आणली. रस्ते काम करताना निकष कशा पद्धतीने डावलण्यात आले, कुठल्या भागातील कामे निकृष्ट झाली याची पोलखोल वृत्तमालिकेतून करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत औरंगाबादच्या सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी दिले. तशा आशयाचे पत्रच चव्हाण यांनी काढले आहेत. चौकशी समितीत सहायक अभियंता राजेंद्र बोरकर (पैठण, श्रेणी-२) उपअभियंता बी.पी. चव्हाण (गंगापूर-श्रेणी-१) सहायक अभियंता ए. आर. भालचंद्र (श्रेणी-२), के.एम.आय. सय्यद (श्रेणी-२) यांचा समावेश आहे.
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गुणवत्ता तपासणीसाठी सुंदरदास भगत यांची चौकशी समिती दोन दिवसांत जालन्यात दाखल होणार आहे. कामांची तपासणी व चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी स्थानिक अभियंत्यांना डावलून मुद्दामहून औरंगाबाद विभागातील अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशी समितीमधील अभियंता शहरातील विविध भागांत झालेल्या काँक्रिटीकरण व इतर कामांचे कोर क्युब नमुने, प्रत्यक्ष चाचणी निष्कर्ष, कामाची सद्य स्थिती, अभिलेखे व गुणवत्ता यासह कामाची सर्व बाबींची समिती पाहणी करणार आहेत. काँक्रिटीकरण करताना निविदेनुसार सर्व निकषांचे पालन झाले का, सिमेंट, खडी, लोखंडांचा वापर, रस्त्याची प्रत्यक्षात असलेली जाडी याचा सर्वांगीण तपासणी समिती करणार आहे. तसेच शोल्डर पेव्हर बसविताना निकषांचे पालन झाले का, निविदेमध्ये दाखल कालावधीतच रस्त्याचे काम पूर्ण झाले का, या सर्व बाबींची या विभागीय समितीमार्फत अत्यंत बारकाईने तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद येथील विभागीय अभियंत्यांना सादर करणार आहे. त्यानंतर अहवालाचा अभ्यास करुन कार्यवाहीची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
------------

शहरातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या नागरिकांतून तक्रारी आल्या होत्या. तसेच लोकमतमध्ये याबाबतची वृत्तमालिका प्रकाशित झाल्याने काँक्रिटीकरणाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी विभागीय समितीची स्थापना केली आहे. पंधरा दिवसांत समिती आपला अहवाल सादर करेल. अहवालाचा अभ्यास करून कार्यवाहीची पुढील दिशा स्पष्ट होईल.
- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, औरंगाबाद विभाग.
.....................

जालनेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणत आहोत. याचा विनियोग योग्य मार्गाने व्हावा, ही आपली भूमिका आहे. लोकमतने सिमेंट रस्त्याच्या कामांबाबत वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता चव्हाण यांच्याकडे या कामांची चौकशीची मागणी आपण केली होती. यावर समिती स्थापन केली असून, सत्य काय ते लवकरच बाहेर येईल.
- खा. रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

Web Title: Inspection by experts will be done for concretization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.