अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची होणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:42 AM2018-11-27T00:42:35+5:302018-11-27T00:42:57+5:30
जालन्यातील कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकावर अशा प्रकारचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील कार्यालये चालतात रेल्वे वेळापत्रकावर अशा प्रकारचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच, त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. विविध विभागात अधिकारी आणि कर्मचारी हे वेळेवर येऊन कार्यालयीन वेळेत थांबतात की, नाही याची शहानिशा करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करून अचानक तपासणी करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली.
सोमवारी लोकमतमध्ये जालन्यातील कार्यालयात ऐन दुष्काळातही अधिकारी आणि कर्मचारी हे भेटत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होते. त्यात अनेक कार्यालयांमध्ये दुपारी ११ वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी येत नसल्याचे दिसून आले. अनेक विभागांमध्ये बायोमेट्रीक पध्दती बसविल्या आहेत. परंतु त्या केवळ नावापुरत्या असल्याचे वास्तव आहे. त्या बायोमेट्रीक हजेरीच्या वेळेनुसारच वेतन देण्या संदर्भातील निर्देश आहेत. असे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, या संदर्भात राजेश जोशी म्हणाले की, कार्यालयात वेळेवर येणे आणि कार्यालयीन वेळेत सामान्य नागरिकांना भेटून त्यांची कामे करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मात्र काही ठिकाणी याची अंमलबजावणी होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. यापुढे शहरासह जिल्ह्यातील कार्यालयात अचानक भेटी देऊन अधिकारी, कर्मचा-यांचा आढावा घेणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.