संवेदनशील केंद्रांची निरीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:08 AM2019-10-10T01:08:14+5:302019-10-10T01:08:30+5:30
अतिसंवेदनशील अशी २७ केंद्र आहेत. या केंद्राची पाहणी नुकतीच त्या-त्या विधानसभा मतदार संघातील निवडणूक निरीक्षकांनी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदान केंद्रांत एकूण एक हजार ६५२ मतदान केंदे्र आहेत. त्यातील अतिसंवेदनशील अशी २७ केंद्र आहेत. या केंद्राची पाहणी नुकतीच त्या-त्या विधानसभा मतदार संघातील निवडणूक निरीक्षकांनी केली आहे. त्या संदर्भात त्यांनी त्यांचा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला आहे.
यंदाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने बुधवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेते आणि पदाधिकारी सकाळी सात पासून घराच्या बाहेर पडून प्रथम ग्रामीण भागात सकाळी ९ च्या आत जात आहेत. नऊ वाजेनंतर अनेक महिला व पुरूष मंडळी ही शेतात कामे करण्यासाठी जातात. त्यामुळे त्यांना कामावर जाण्या आधीच गाठून मतदान करण्यासाठी रिझविण्याचे काम सुरू आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात म्हणून अनेकजण वरिष्ठांकडे स्टार प्रचारकांना प्राधान्य देत आहेत. विधानसभेच्या निवडणूका शांततेत पार पडाव्यात म्हणून निवडणूक निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या समवेत बैठक घेऊन आढावा घेतला.
या संवेदनशील मतदान केंद्रांवर शस्त्रधारी केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी सांगितले.
बँक व्यवहारावर बारकाईने नजर
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांतील क्षेत्रात येणा-या बँक व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर आहे. संशयित खात्यातून एक लाखापेक्षा अधिक रक्कम काढल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्व बँक व्यवस्थापकांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे सांगितले आहे.