कृषी सचिवांकडून वानडगावात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:05 AM2019-08-06T01:05:57+5:302019-08-06T01:06:53+5:30
राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी बदनापूर तालुक्यातील वानडगाव येथे सामूहिक कापूस पीक अभियानाला भेट देऊन पाहणी केली. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वानडगावामध्ये जवळपास ७५०० कामगंध सापळे लावले आहेत.
एकनाथ डवले यांनी रविवारी वानडगावसह मंठा तालुक्यातील केंधळी व इतर गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राकडून मक्यावरील लष्करी बोंड अळी आणि कापसावरील बोंडअळी यांचा प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचे त्यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी, कृषी अभियंता पंडित वासरे, सचिन गायकवाड, व्यवहारे, पठाण यांनी डवले यांना विविध विषयांची माहिती दिली. पाऊस लांबल्याने काही भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असल्याचे सांगण्यात आले. एकूणच कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.