परिक्षणासाठी शिवाराऐवजी आता प्रत्येक शेतातून घेणार माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:01 PM2019-06-05T12:01:28+5:302019-06-05T12:06:39+5:30
पायलट योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनितीचे माती परीक्षण मोफत करण्यात येणार आहे.
- गजानन वानखडे
जालना : जिल्हा मृद सर्वेशन आणि मृद चाचणी विभागाच्या वतीने आता माती परीक्षणाच्या तंत्रात अनेक बदल केले आहेत. त्यानूसार पूर्वी एका शिवारातील माती घेऊन त्या शिवाराचा अहवाल दिला जायचा; आता प्रत्येक शेतकऱ्याकडून माती घेऊन त्यांच्या शेतीचे प्रगती कार्ड मोफत देण्यात येणार आहे.
बेसुमार उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, किटकनाशकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकऱ्याच्या आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. यामुळे राज्य शासनाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत माती परीक्षण करुन मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतातील माती परीक्षण केले आहे.
यात मोठ्या प्रमाणात स्फुरद, नत्र, आणि जस्त या मुलद्रव्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी यावर्षी केंद्र आणि राज्यशासनाने २०१९ - २०२० या वर्षासाठी पायलट योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनितीचे माती परीक्षण मोफत करण्यात येणार आहे.
पूर्वी १० हेक्टरच्या परिसरातील एका शेतकऱ्याच्या जमिनीतील माती नमुन्याची तपासणी करुन परिसरातील दहा शेतकऱ्यांना सारखाच अहवाल देण्यात येत होता. अनेकवेळा यात शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. यामुळे शासनाने यात बदल करुन आरोग्य पत्रिका वाटप केलेल्या प्रत्येक खातेदाराच्या शेतातील माती नमुन्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा मृद सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ४३८३ शेतकऱ्यांच्या शेतातील माती नमुने घेतले आहेत. या तपासणीमुळे शेतात कोणत्या घटकाची कमतरता आहे, हे खरिपापूर्वी कळणार असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
तपासणीसाठी ४ हजार नमुने
शासनाने माती परीक्षणाच्या जुन्या पध्दतीमध्ये बदल करुन आरोग्य पत्रिक वाटप केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील मातीच्या नमुने तपासणी घ्यावे, असे आदेश दिले आहेत. आतापर्यत ४ हजारपेंक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती नमुने तपासणीसाठी घेतले. - ए. एस. भवरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी.