फौजदार होता होता राहिलो म्हणून खासदार झालो; रावसाहेब दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:22 PM2023-02-17T17:22:40+5:302023-02-17T17:24:11+5:30
नोकरीसाठी वशीला लावणाऱ्यांना रावसाहेब दानवेंनी सांगितला स्वत:चा किस्सा
- दिलीप सारडा
बदनापूर ( जालना) : खासगी तसेच सरकारी नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर मुलाखतीच्या आधीच अनेकजण पुढाऱ्यांकडे वशिला लावण्यासाठी जातात. सन १९७७ साली पोलीस दलात निघालेल्या भरतीत मी फॉर्म भरला होता. त्याला कॉल आल्यावर मीसुद्धा तेव्हाचे खासदार पुंडलिकराव दानवे यांच्याकडे जाऊन गृहमंत्र्यांना फोन लावून वशिला लावण्याची मागणी केली होती. तेव्हा पुंडलिकराव दानवे यांनी तू आमदार, खासदार व्हावं. फौजदार कसला होतोस, असे म्हणाले होते. पुढे नियतीचा काय खेळ झाला आणि आमदार, खासदार झालो. कोणाच्या बोलण्याने काय होईल हे सांगता येत नाही, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथील रोजगार मेळाव्यात आपल्या वशिल्याचा किस्सा युवकांना सांगितला.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, देशात नोकरीची कमी नाही. पण कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेकजण परीक्षा व मुलाखतीची तयारी न करता फॉर्म भरला की पुढाऱ्याकडे जातात. मी प्रथम गावचा सरपंच झालो व नंतर आमदार, खासदार आणि आता मंत्री असा चढत चढत वरपर्यंत गेलो. त्यामुळे संयम ठेवा. मेहनत करा असा सल्लाही रावसाहेब दानवे यांनी युवकांना दिला. जिथे नोकरी कराल ती नोकरी इमानदारीने करा. नोकरी मिळत नसेल तर कर्ज घेऊन व्यवसाय करा. कर्ज फेडा नसता शेती उत्तम पर्याय आहे. पण शेतीवरचा भार कमी करण्यासाठी तुम्ही रोजगारासाठी घराबाहेर पडा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
या वेळी आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, भाऊसाहेब घुगे, बद्रीनाथ पठाडे, वसंत जगताप, जगन्नाथ बारगजे, हरिश्चंद्र शिंदे, देविदास कुचे, शीतल कुचे, प्राचार्या भगुरे, उपनगराध्यक्ष शेख समीर, नगरसेवक सत्यनारायण गेल्डा, पद्माकर जऱ्हाड, विलास जऱ्हाड, प्रदीप साबळे, भगवान मात्रे, अनिल कोलते, राजेंद्र तापडिया, निवृत्ती डाके, शेख युनूस, सुधीर पवार यांची उपस्थित होती.