‘त्या’ रस्त्यांच्या चौकशीचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:54 AM2019-12-04T00:54:14+5:302019-12-04T00:55:24+5:30
रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या काही वर्षात कोट्यवधी रूपयांच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. ही कामे करताना टेंडर मधील निकषांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे आज या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
जालना जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निकष डावलून रस्ते मजबुतीकरण करण्यात आले होते.यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च होऊनही रस्त्यांच्या कामांचे तीन-तेरा वाजले आहेत. या रस्त्यांची कामे करतांना ती निवडणुकीच्या काळात अनेक कंत्राटदारांनी मनाला येईल तशी कामे उरकून बिले वसूल केली आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी उच्वस्तरीय अधिकाऱ्यांकडून करावी, अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी गेल्या महिन्यात आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी याची चौकशी करावी असे पत्र उपायुक्त सूर्यकांत हजारे यांनी दिले असून, अहवाल देण्याचे सांगितले आहे.
गोरंट्याल : त्या टेंडर व्यतिरिक्त ही कामे
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर जालन्यासह अन्य विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदे अंतर्गत टेंडरचे निकष पूर्ण करताना रस्त्यांच्या कामांचा धडाका लावला होता. हा धडका थेट मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लक्ष घालून तो थांबवला होता.
त्यावेळी सर्व टेंडर रद्द करून त्या प्रकरणाची चौकशी देखील प्रस्तावित केली होती. त्यानंतर आता आ. कैलास गोरंट्याल यांच्या या मागणीमुळे कंत्राटदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.