पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कॉपीबहाद्दरांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 01:28 AM2020-02-20T01:28:38+5:302020-02-20T01:29:17+5:30
होमगार्डनी टाकलेल्या बहिष्काराचा परीक्षा बंदोबस्तावर परिणाम झाला असून, कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील पोलीस ठाण्यात मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी असल्याने बारावीच्या परीक्षा बंदोबस्तावरही याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे होमगार्डनी टाकलेल्या बहिष्काराचा परीक्षा बंदोबस्तावर परिणाम झाला असून, कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यात ११ परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाली आहे. १८ रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. त्यामुळे काही परीक्षा केंद्रावर पालकासह काही शिक्षक, काही रोडरोमिओंमध्ये परीक्षार्थींना कॉप्या पुरविण्यासाठी चढाओढ दिसून आली. त्यांना लगाम लावण्यासाठी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचा-याच्या नाकी नऊ आले. परीक्षेच्या काळात प्रत्येक वर्षी सेंटरवर पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्डच्या नियुक्त्या करण्यात येत होत्या. त्यामुळे एका परीक्षा केंद्रावर दोन पोलीस कर्मचारी व तीन- चार होमगार्ड कर्तव्य बजावत होते. मात्र यंदा थकीत वेतनामळे होमगार्डनी या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे परीक्षेचा बंदोबस्त पाहण्याचे काम पोलीस यंत्रणेवर पडले आहे.
भोकरदन ठाण्यातील पोलीस कर्मचाºयाची संख्या ही निजाम कालीन आहे. ठाण्याच्या हाद्दीत भोकरदन शहरासह ७६ गावांचा समावेश आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्येसाठी केवळ ५२ कर्मचारी आहेत. यातील अनेक कर्मचारी विविध कारणांस्तव रजा, सुट्यांवर असतात. त्यामुळे केवळ ३५ कर्मचारीच पोलिस ठाण्यात नियमित हजर राहतात. परिणामी, ठाण्यात किती कर्मचारी ठेवायचे व बंदोबस्तासाठी किती द्यायचे, याचा ताळमेळ लावताना अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. शिवाय परीक्षा सेंटरमध्ये पेपर गार्डसाठी चार कर्मचारी द्यावे लागले असून, दोन सत्रात ८ कर्मचारी या ठिकाणी अडकले आहेत. खाली केवळ २७ कर्मचारी उरत असून, कोणी सुटीवर तर कोणी रिकमध्ये असल्याने इतर बंदोबस्त करायचा कसा, असाही प्रश्न अधिका-यांसमोर आहे. परीक्षा केंद्रावरच कमी कर्मचारी असल्याने कॉपी पुरविणा-यांची मात्र, चांदी होत असून, काही सेंटरवर कॉप्यांचा धंदा सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनाने कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्याची गरज आहे.
परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी
भोकरदन शहर व तालुक्यातील परीक्षा केंद्राबाहेर कॉप्या पुरविणाºयांची गर्दी होत आहे. शिवाय ज्या शिक्षकांना ड्युटी नाही, ते शिक्षकांसह खाजगी शिकवणी चालकही केंद्राच्या परिसरात घिरट्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्रातील बैठे पथक करते काय, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.