समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट स्थलांतराच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:02 AM2018-02-02T00:02:27+5:302018-02-02T10:51:29+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट (चढ-उतार स्थळ) जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असताना सदरील चढउतार स्थळ तेथून इतरत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरु झाल्या आहेत.
जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट (चढ-उतार स्थळ) जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असताना सदरील चढउतार स्थळ तेथून इतरत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरु झाल्या आहेत. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने स्थलांतरणास विरोध दर्शविला असून स्थलांतर झाल्यास मुंबई येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांनी दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिका-यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर येथे नवनगर प्रस्तावित असून या गावांतील संपूर्ण शेतजमिनीवर तसे आरक्षण टाकण्यात आले आहे. चढउतार स्थळामुळे या भागातील दोनशे एकर शेतजमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले असून त्यात या गावांच्या जमीन गटांचा समावेश आहे. इंटरचेंज पॉईंटसाठी जानेवारी २०१८ मध्ये मोजणी होणार होती. तथापि अचानक ही संयुक्त मोजणी थांबविण्यात आली. या पॉईंटमुळे बाधित शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. शेतक-यांची मुले स्वयंरोजगार करु शकली असती त्यामुळे येथील शेतकरी समाधानी होती. मात्र, जालना शहरातील काही उद्योजकनी खातगाव येथे शेतजमिनी खरेदी करुन तेथे मुंबईतील उच्चपदस्थ अधिका-यांना हाताशी धरून इंटरचेंज पॉइंट हलविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे तीस लक्ष प्रति एकर भावाने मिळण्याऐवजी खातगाव शिवारातील ऐंशी ते नव्वद लाख रुपये प्रति एकर दराने खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. निवेदनावर नारायण गजर, वैजीनाथ वैद्य, विजय लहाने, भरत कापसे, परमेश्वर कापसे, राजू गजर, बबन डवले, मोकींद लांडगे, बाबासाहेब गजर, गोविंद लहाने आदींच्या स्वाक्ष-या आहेत.