मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:30 AM2019-03-15T00:30:37+5:302019-03-15T00:30:52+5:30
गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.
हा संप मागे घ्यावा म्हणून मध्यस्थी करण्यात येत आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन संप मागे घेण्याची मागणी केली. असे असताना बँकेच्या अध्यक्षांनी भेट का दिली नाही, असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.
ऐन दुष्काळात अनुदान व पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांना संपामुळे त्रास सहन करावा लागत आहे. न्याय व हक्काच्या मागण्यासाठी बँक व व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने को-आॅपरेटीव्ह बँक एम्लाईज युनियनच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचारी ११ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत.
सन २०१० पासून स्थगित असलेला महागाई भत्ता प्रचलित दराने शंभर टक्के अदा करावा या व इतर मागण्या १५ दिवसात मान्य न केल्यास बेमुदत संपाबाबत कळविण्यात आले होते. तरी देखील बँक व्यवस्थापनाने कोणताही निर्णय न घेतल्याने संप करण्यात येत आहे. २००७ मध्ये न्यायालयाने महागाई भत्ता देण्याबाबत निकालही दिला होता. मात्र, या निकालाकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अडीच ते तीन कोटी रुपये जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा भत्ता थकीत आहे. तसेच बीड, औरंगाबाद, परभणी येथील शाखेतील कर्मचा-यांना हा भत्ता मिळत असून, केवळ जालना जिल्ह्यातील कर्मचा-यांवरच अन्याय होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त शेतक-यांचे या बँकेत खाते आहे. त्यामुळे याच बँकेत शेतक-यांना मिळणारे अनुदान वर्ग केले जाते, मात्र, बँकेच्या संपामुळे शेतक-यांच्या अनुदानाच्या याद्या व धनादेश तहसील कार्यालयात पडून आहेत. दरम्यान या संदर्भात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, कर्मचा-यांच्या मागणीवर यशस्वी तोडगा संचालकांच्या बैठकीत निघेल असे त्यांनी सांगितले.