इंटरनेट सेवा विस्कळीत : नामनिर्देशन पत्र भरण्यास अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:05+5:302020-12-30T04:41:05+5:30
अंबड तालुक्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक ...
अंबड तालुक्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे शहरातील इंटरनेट कॅफे, सेतू सुविधा केंद्रांवर उमेदवार अर्ज भरण्यासाठी गर्दी करीत आहे. सोमवारी अंबड शहरातील इंटरनेट कॅफेवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली; परंतु दिवसभर इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत नेट कॅफेजवळ बसूनही अनेकांना अर्ज भरता आला नाही. यामुळे उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
अंबड शहरात गेल्या काही आठवड्यांपासून इंटरनेट सेवेबरोबरच नेटवर्क नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे शासकीय तसेच खासगी कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत. बँकेच्या व्यवहारावरही याचा परिणाम झाला आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे; परंतु शहरात इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहे. तातडीने इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एकबाल शेख यांनी दिला आहे.