गावठी पिस्तुलासह अट्टल दरोडेखोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:08 AM2018-05-01T01:08:46+5:302018-05-01T01:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यभरात विविध ठिकाणी, चोरी, घरफोडी, खून यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या शेख इकबाल शेख शफी ( २८ रा.गेवराई जि.बीड, ह. मु. मुकुंदवाडी, औरंगाबाद) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक रविवारी रात्री केली. पोलिसांनी त्याच्याकडून एका गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसेही जप्त केली आहे.
शेख इकबाल हा रविवारी रात्री गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने रेल्वेस्थानक परिसरातील बँक कॉलनीजवळ फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एका गावठी पिस्तुलासह २५ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुसे जप्त केले आहे. त्याचावर जालना, औरंगाबाद, परभणी, तेलंगणा, अदिलाबाद आदी ठिकाणी विविध गंभीर गुन्हे आहेत. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, विलास चेके, वसंत राठोड यांनी ही कारवाई केली.
संशयित शेख इकबाल याचा बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आंरराज्य टोळीशी संबंध आहे. आंध्रप्रदेशातील बासरमध्ये त्याने एका सराईत गुन्हेगारासोबत खुनाचा गुन्हा केला आहे. कायम गावठी पिस्तुल बाळगणे, रेल्वेने फिरणे, रेल्वेत चोरी, पाकीटमारी करणे आदी गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले. औरंगाबाद ग्रामीणमध्ये त्याच्यावर एका यात्रेत फायर केल्याचा गुन्हा दाखल आहे.