सीईओ विनयभंग प्रकरणाचा तपास अधिकारी बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:24 AM2018-01-17T00:24:48+5:302018-01-17T00:24:51+5:30
सीईओ दीपक चौधरी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणाचा तपास अधिकारी अचानक बदलण्यात आल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सीईओ दीपक चौधरी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणाचा तपास अधिकारी अचानक बदलण्यात आल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक चौधरी यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील विविध महिला संघटना आणि सामाजिक संघटनांनी निदर्शने करुन सीईओंच्या निलंबनाची मागणी केली.
पोलिसांवर दडपण वाढल्याने सीईओ चौधरी पोलीस ठाण्यात हजर झाले. नंतर त्यांना तात्काळ जामीन मिळाला. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्याकडून याचा तपास काढून घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली येमपुरे यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार म्हणाले की, उपनिरीक्षक जाधव यांच्याकडून साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने तपास काढून घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीईओ बराच वेळ जिल्हा परिषदेत
विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीईओ दीपक चौधरी यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबईत ते रुजू झाले असले तरी मंगळवारी जालन्यात आले होते. जिल्हा परिषदेत बराच वेळ काही अधिका-यांसमेवत त्यांनी काही महत्त्वाच्या विषयांववर चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चौधरी यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. काही राहिलेली कागदपत्रे घेण्यासाठी ते जिल्हा परिषदेत आले असतील. इतर काही कारण असेल ते आपण सांगू शकणार नाही. तरीही याची सविस्तर माहिती घेण्यात येईल.
फड यांच्या निगराणीखाली तपास
वरिष्ठ महिला अधिका-याकडून तपास व्हावा, अशी जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांची मागणी होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पदावरील महिला अधिका-याकडे देण्यात आला आहे. तरीही अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या निगराणीखाली या प्रकरणाचा तपास केला जाईल.
- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक, जालना