३०३५ जणांची तपासणी, ११ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:33 AM2021-08-13T04:33:59+5:302021-08-13T04:33:59+5:30
जालना : जिल्हा रुग्णालयास गुरुवारी ३०३५ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर ...
जालना : जिल्हा रुग्णालयास गुरुवारी ३०३५ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे, तर रुग्णालयातील यशस्वी उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या १२ जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनास आरटीपीसीआर तपासणीच्या २९२५ नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अँटिजेनच्या ११० तपासणीत एकालाही बाधा झाल्याचे दिसून आले नाही. बाधितांमध्ये जालना शहरातील तीनजणांचा समावेश आहे, तर मंठा तालुक्यातील नानसी १, घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड १, अंबड तालुक्यातील आपेगांव १, भोकरदन शहरातील तीन, वालसा खालसा १, अलापूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात १८ जणांना ठेवण्यात आले आहे. यात जालना शहरातील राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉकमध्ये पाचजणांना ठेवण्यात आले आहे, तर अंबड शहरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात १३ जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात १३१ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६१ हजार ६३३ वर गेली असून, त्यातील ११८२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर ६० हजार ३२० जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १३१ सक्रिय रुग्ण असून, त्यातील काहींवर अलगीकरणात, तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.