पुरुषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावीच लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:01 AM2018-04-13T01:01:16+5:302018-04-13T01:01:16+5:30
मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मनूची भिंत गाडली असली तरी समाजाने स्वत:ला या भिंतीत गाडून घेतले आहे. समतेच्या गप्पा मारायचा पण सज्ञान झाल्यावरही जिथे मुलींना जोडीदार निवडण्याचा हक्क नाही, तिथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महिलांभोवती असलेली पुरूषी सत्तेची अदृश्य साखळी तोडावी लागेल, अशी रोखठोक भूमिका पुणे येथील स्तंभ लेखिका अश्विनी सातव-डोके यांनी मांडली.
फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बुधवारी ‘सावित्रींच्या लेकी घरोघरी, शोध ज्योतिबांचा जारी’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे या होत्या. यावेळी डॉ. स्मिता चव्हाण, अनिता जाधव, व्याख्यानमालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहूळे, मिलींद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रशांत आढाव प्रमुख उपस्थिती होती.
अश्विनी सातव म्हणाल्या, परंपरेच्या जोखडांविरूध्द सावित्रीबाई उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या जोतिबांची आज गरज आहे. आयटी क्षेत्रातील तरुणी पोथी-पुराणात अडकलेल्या आहेत. महिलेला माहेरी, सासरी कुठेच स्थान नसते. केवळ नऊ महिन्यांचा गर्भच तिची संपत्ती आहे. मुलगा होत नाही तर सोडून दे, अशी हिणवणी केली जाते. सरकार एकीकडे बेटी-बचावचा नारा देत असतांना त्यांचेच लोक अत्याचार करत आहेत. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारखे सहजीवन प्रत्येक महिलेस लाभावे, तेव्हाच खरी समता येईल. स्त्री कुणाच्या मालकीची आहे, ही मानसिकता बदलावी लागेल. काळजी वाटूच नये असा समाज निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. पार्वताबाई रत्नपारखे यांनी व्याख्यानमाला यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. डॉ. स्मिता चव्हाण यांनी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले. अनिता जाधव यांनी समतेचा भारत उभा करण्यासाठी महिलांनी तयार व्हावे असे सांगितले. वैशाली गरड यांनी सूत्रसंचालन केले. आदर्शा शरणागत यांनी आभार मानले.