जालन्यात 'आयपीएल बेटिंग ऑन व्हील'; सट्टाबुकी मनोज अग्रवाल मुद्देमालासह अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:41 PM2019-04-07T13:41:29+5:302019-04-07T13:43:58+5:30
राज्यस्तरीय आयपीएल बुक्कीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जालना : शहरात कारमध्ये सट्टा चालविणाऱ्या एका व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मनोज रमेशचंद्र अग्रवाल असे सट्टाबुकीचे नाव असून त्याच्याकडून 5 लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात मनोज रमेशचंद्र अग्रवाल हा व्यापारी एका महागड्या कारमधून चालता- फिरता आयपीएल सट्टा चालवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अग्रवाल यास मोबाईलवर सट्टा खेळतांना व खेळवितांना त्याच्या कारमध्ये (एमएच-21, एएक्स-459) रंगेहाथ पकडले. यावेळी त्याच्या ताब्यातून एक कार, तीन मोबाईल,असा 5 लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अग्रवाल याच्यासोबत संबंध असलेला राज्यस्तरीय बुक्की नितीनभाई अग्रवाल (नागपूर) तसेच मोबाईलवर ऑनलाईन सट्टा खेळणारे अनिल गव्हाणे, संदीप आम्ले, कैलास सकुंडे, अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज अग्रवाल याच्याविरुद्ध 2 वर्षापूर्वीदेखील अशीच कारवाई करण्यात आली होती. अग्रवाल याचे कडबीमंडी भागात अग्रवाल सॅनीटेशन व हार्डवेअर नावाचा व्यापार आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, ज्ञानेश्वर सानप, कर्मचारी कैलास कुरेवाड, गोकुळ कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, सागर बाविस्कर, मदन बहुरे यांनी केली.