इस्लामने मानवतावादी दृष्टिकोन जगाला दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:02+5:302021-02-05T07:58:02+5:30
जाफराबाद : पवित्र धर्मग्रंथ कुराण व हदिसच्या माध्यमातून इस्लाम धर्माने संपूर्ण जगाला मानवतावादी दृष्टिकोन दिला, असे विचार जमात ...
जाफराबाद : पवित्र धर्मग्रंथ कुराण व हदिसच्या माध्यमातून इस्लाम धर्माने संपूर्ण जगाला मानवतावादी दृष्टिकोन दिला, असे विचार जमात ए इस्लामी हिंदचे व्याख्याते शेख लुकमान यांनी मांडले.
जमाततर्फे अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियानाअंतर्गत जाफराबाद येथे सोमवारी शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेला जमात ए इस्लामी हिंदचे जाफराबाद प्रमुख मुमताज खान, सुखदेव अवकाळे, विनोद कळंबे, शंकर लहाने, संजय लहाने, सुधाकर चिंधोटे, सखाराम नवले, दत्ता नागरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना लुकमान म्हणाले की, इस्लामने आजपासून चौदाशे वर्षांपूर्वी मुलांप्रमाणे मुलीही तितक्याच श्रेष्ठ आहे हे तत्कालीन पशुवत जीवन जगणाऱ्या समाजाला दाखवून दिले. मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलींनाही सन्मानाने स्वीकारा. तुमच्या मुलींचा तुम्ही चांगला सांभाळ केला तर तुमच्या स्वर्गीय सुखाचे त्या कारण बनतील. मात्र आजही समाजात स्त्रीभ्रूण हत्येचे घोर पाप केले जात असल्याचे दुर्दैवी चित्र दिसते, असेही ते म्हणाले. काळा- गोरा, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष अशी कुठलीही दरी इस्लामला मान्य नसून, सर्व मानवजात ही एकाच ईश्वराची निर्मिती असल्याने आपण सर्व भावंडे आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांना अंधारातून प्रकाशाकडे या अभियानाची माहितीपत्रका वाटप करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जमातचे शेख तालेब, हाफिज नईम, शाजिल शहा आदींनी परीश्रम घेतले.