प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट करिअर करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:42 AM2018-06-20T00:42:09+5:302018-06-20T00:42:09+5:30
केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथील जेईएस महाविद्यालयात जालना एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले केले होते. यावेळी जेइएस संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना धर्माधिकारी म्हणाले की, देवाने प्रत्येकाला बुध्दी ही समान दिली आहे. त्या बुध्दीचा तो कसा वापर करतो हे महत्वाचे ठरते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी ध्येय निश्चित करून, त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. आजच्या स्पर्धेच्या युगात सीईटी परीक्षेला महत्व दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येते. मात्र अधिकारी झाल्यावर त्याचा अहंकार बाळगू नये, तसेच गैरमार्गाने पैसा कमावणे हे उद्दिष्ट ठेवू नये असे ते म्हणाले. यश आणि अपयश हे जीवनात पदोपदी येत असते. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता, हिंमतीने त्याला समारे जाण्याचे धाडस ठेवावे असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती ही उच्च दर्जाची असल्याचे सांगून आईस्टाईन या शास्त्रज्ञाने देखील भगवद्गीतेचा अभ्यास केल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.