रासायनिक खताची विक्री ऑनलाईन पध्दतीने करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:22+5:302021-01-23T04:31:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : खत विक्रेते, उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांची विक्री ऑनलाईन पध्दतीनेच करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खत विक्रेते, उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांची विक्री ऑनलाईन पध्दतीनेच करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले.
जिल्ह्यातील खत विक्रेते, उत्पादक कंपन्यांची गुरूवारी जिल्हा परिषदेतील कृषी भवनमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रभा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात २२ फिंगर प्रिंट स्कॅनरचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ई-पॉस मशीनद्वारे रासायनिक खतांची विक्री करताना घ्यावयाची काळजी, येणाऱ्या अडचणी सोडविणे, डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणे, रासायनिक खतांची ऑफलाईन विक्री न करणे आदी विषयांवर रणदिवे व शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या सूचनांचे उल्लंघन केले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या कार्यशाळेला जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक विशाल गायकवाड, प्रदर्शन मोहीम अधिकारी सुधाकर कराड यांच्यासह खत विक्रेते, उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो