देशाच्या प्रतिनिधित्वाची संधी मिळणे हे माझे भाग्यच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:29 AM2019-09-08T00:29:48+5:302019-09-08T00:30:21+5:30
२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
२५ ते २८ आॅगस्टदरम्यान मलेशिया येथे आतंरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. या परिषदेत जालन्याच्या शिवानी सिरसाट हिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. याबद्दल तिची घेतलेली मुलाखत.
वक्तृत्वाची आवड कशी निर्माण झाली ?
वक्तृत्वाची आवड अगदी लहानपणचीच. ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालयात असताना प्रत्येक नेत्यांची जयंती असो की, २६ जानेवारी, १५ आॅगस्ट सारखे राष्ट्रीय उत्सव. भाषण करण्याला माझे प्रथम प्राधान्य असायचे. वडिलांना पुस्तक वाचनाची आवड असल्याने घरी पुस्तकांचे ग्रंथालयच आहे. मलाही ती आवड जडली. पुस्तक वाचता-वाचता कुठे तरी आपल्याकडच्या वाचलेल्या ज्ञानाची देवाण - घेवाण व्हावी या उद्देशाने वक्तृत्वामधील माझा आत्मविश्वास वाढला आणि जेईएस महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेताना ती आवड जपली. माझ्या वक्तृत्वामध्ये मी स्वत: बदल घडवले. म्हणून आजचे यश संपादन करू शकले.
जालना ते मलेशियापर्यंतचा प्रवास कसा राहिला ?
आई- वडिलांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि महाविद्यालयाच्या मदतीने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व वादविवाद स्पर्धा करू लागले. त्यामध्ये यश-अपयशही मिळत गेले. त्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय युवा संसद २०१९ या मोठ्या यशानंतर सुवर्णसंधी आली. ती मलेशिया येथे नुकतीच पार पडलेल्या आशियाई आंतरराष्ट्रीय युवक परिषदेची.
तुमचा नवीन वक्ते युवकांसाठी संदेश काय राहील ?
नवीन वक्त्यांसाठी एकच सल्ला राहिल. स्पर्धेत क्रमांक येत नाही म्हणून स्पर्धा करणं सोडू नका. प्रयत्न करत राहा, जिद्द ठेवा, स्वत:तील उणीवा ओळखा व त्यावर काम करायला सुरुवात करा. यश नक्कीच येईल.
तुम्ही निवडलेलं क्षेत्र कोणतेही असो कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक त्यात तुमचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा. त्यात एक दिवस तुम्हाला नक्कीच यश येईल. माझ्या आई - वडिलांनी मला पाठिंबा व पोत्साहन दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक पालकांनी मुलींना पोत्साहन दिले पाहिजे.
अनोखा अनुभव
मलेशिया येथे आशियाई आंतरराष्ट्रीय युवक परिषद पार पडली. जगभरातील युवा नेत्यांशी संवाद साधता आला. जागतिक समस्या आणि त्यावर उपाययोजना काढण्यात आल्या. एकंदरीत चार दिवसांचा अनुभव नवीन जग शिकवून गेला. विकसित देशांमधील आणि आपल्या भारतामधील फरक या परिषदेतून समोर आला. आपण सुद्धा विकसित होऊ शकतो गरज आहे ती देशाला प्रथम प्राधान्य देण्याची.