सामाजिक वेदनेतूनच दर्जेदार साहित्याची निर्मिती होऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:17 AM2020-02-02T01:17:19+5:302020-02-02T01:19:09+5:30
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रतिभा साहित्य संगम साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एरवी छंद म्हणून कथा, कविता करणारे सर्वत्र आढळतील. परंतु जर दर्जेदार साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा असेल तर, त्यामागे तुम्हाल संबंधित परिस्थिती आणि समाजातील बारीक-सारीक बाबींकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी हवी असते. त्यातील बारकावे आणि त्याचे सामान्यांवर होणारे परिणाम शोधून ते तुमच्या साहित्य, कवितांमधून उमटल्यासच दर्जेदार साहित्य निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले.
काळे यांच्या हस्ते शनिवारी येथील अग्रसेन फाऊंडेशनमध्ये १८ राज्यस्तरीय प्रतिभा साहित्य संगम साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अत्यंत प्रभावी मांडणी करत अनेक इतिहासाचे दाखले देत, कथा, कविता, ललित साहित्याची दर्जेदार निर्मिती होण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आणि घटकांची आवश्यकता हे समजावून सांगितले. केवळ काहीही दिसले आणि त्यातून यमक जुळवून कविता लिहिल्यास ती दर्जेदार होईलच, असे नाही.
दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी तुम्ही स्वत: संवेदनशील पाहिजे. समाजाकडे बघतांना त्यातील दु:ख तसेच यातना काय आहे, हे कळणे गरजेचे असते. त्यासाठी समाजाशी एकरूप होणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांनी जे साहित्य निर्माण केले त्यातून त्यांची वेदना स्पष्ट होते. प्रत्येक गोष्ट करताना ती मनापासून केल्यासच यश मिळते. मग ते एकमेकांवर जडणारे प्रेम का असेना; असे त्यांनी नमूद केले. रामायणाची निर्मिती देखील ऋषी वाल्मिकींनी क्रौंच पक्ष्याच्या शिकारीनंतर त्याला झालेल्या वेदनेचाच पहिला श्लोक असल्याचे काळे यांनी सांगितले. आपल्या मनातील जुने दृष्टीकोन काळानुरूप बदलेले पाहिजे असे सांगताना त्यांनी त्रिकोण म्हटल्यावर आपल्या समोर केवळ समव्दिभुज त्रिकोणच समोर येतो. परंतु त्रिकोणांचे अनेक प्रकार आहेत, हे आपण विसरतो.
अनेक घटनांमागे तुमची तळमळ आणि त्याच्या बद्दल असलेले उत्कट प्रेम महत्वाचे असते. याचे उदाहरण देताना त्यांनी कवी बा.सी. मर्ढेकर, सुरेश भट, कुसुमाग्रज यांची गर्जा महाराष्ट्र माझा...स्वातंत्र्य वीर सावरकरांचे ने मजसी ने... सागरा... इ. उदाहरणे दिली. एकूणच अक्षयकुमार काळे यांच्या अत्यंत मार्मिक मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थी भारावले होते. मनन, चिंतन आणि वाचन ही त्रिसूत्री त्यांनी युवकांना समाजावून सांगतानाच मराठी भाषेची म्हणजेच मातृभाषेची गरज विशद केली.
प्रारंभी डॉ. काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, १८ व्या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ. सुरेश मुंढे, डॉ. सुनील कुलकर्णी, आयसीटीच्या संचालक स्मिता लेले, उद्योजक शिवरतन मुंदडा, आनंद कुलकर्णी, सुरेश केसापूरकर, साहित्यिक रेखा बैजल, प्रा. बसवराज कोरे, प्रा. रावसाहेब ढवळे, संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर, शिवकुमार बैजल व इतरांची उपस्थिती होती.
संमेलनातील वेळेचा मुद्दा : ‘ती’ चिठ्ठी दिली अन.. अक्षयकुमार काळे यांचे भाषण थांबले...
डॉ. अक्षयकुमार काळे यांचे भाषण ऐन रंगात आले होते. अनेक मार्मिक आणि तार्किक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीची गरज त्यातील बारकावे समजून सांगत होते. याचवेळी संयोजन समितीतील विद्यार्थ्याने आपली भाषणाची वेळ संपली आहे... अशी चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी देताच डॉ. अक्षयकुमार काळेंनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपले भाषण अर्धवट सोडले. तसेच ही पध्दत चांगली नसल्याचे सांगून आपण काही येथे केवळ मानधन मिळावे म्हणून आलो नाही, असे सांगून त्यांनी आपला राग व्यक्त केला. या प्रकारानंतर व्यासपीठावरील उपस्थितांनी त्यांची जाहीर माफी मागून पुन्हा मार्गदर्शन करण्याची विनंती केली, परंतु नंतर ही विनंती डॉ. काळे यांनी नाकारून व्यासपीठ सोडले.
... तरच साहित्याची निर्मिती करा- ढोके
जालना : वेदांमध्ये कवी म्हणजे जीवनाचे संपूर्ण दर्शन घेतलेला प्रतिभा संपन्न महापुरूष आहे. त्यामुळे साहित्याची निर्मिती करताना पूर्वी कोणीही सांगितलेले नाही. असे जगावेगळे साहित्य निर्माण करण्याची ताकद निर्माण करा आणि नंतरच लिखाणाला सुरूवात करा, असे मत प्रा. डॉ. भास्कर ढोके यांनी व्यक्त केले.
शहरात आयोजित प्रतिभा संगम साहित्य संमेलनाच्या दुपारच्या सत्रात ‘साहित्याची सृजन प्रक्रिया’ या विषयावर प्रा. ढोके बोलत होते. यावेळी सिद्धेश्वर लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. ढोके म्हणाले, मानवाच्या उत्क्रांतीमध्ये माणसाचा समूह म्हणून जन्म झाला. तो समूहाने राहायला लागला. हळूहळू भाषेचे वेगवेगळ््या प्रकारचे आविष्कार त्याला जमायला लागले. यातून जगण्याच्या प्रेरणांमध्ये बदल झाला. भाषेचा शोध आणि दोन हातांची विशिष्ट रचना यामुळे नवनवीन गोष्टी करायला मानवाने सुरूवात केली. हाताने करायच्या गोष्टी आणि बुद्धीने करायच्या गोष्टी याची विभागणी सुरू झाली. काळांतराने बुद्धीच्या सहायाने शरीराच्या क्षमतांचा उपयोग करून मानवाने निसर्गावर आपल्या सोयीसाठी काही बदल करण्यास सुरूवात केली. आणि येथेच संस्कृतीचा जन्म झाला, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ढोके म्हणाले की, साहित्याच्या सृजन प्रक्रियेमध्ये केवळ महत्त्वाची गोष्ट असते. शब्दांना शब्द जोडून कविता निर्माण होत नाही किंवा मनामधील काही तरी फापटपसारा मांडून कथा किंवा कादंबरी लिहिता येत नाही. तिला स्वत:चे एक रूप असते. परंतु, तुमच्या धारणा काय आहेत. त्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे. साहित्याची निर्मिती नेहमी भावनिक कृती वाटत असली तरी प्रत्यक्षामध्ये ती भौतिक स्वरूपाची कृती असते. त्यामुळे अनुभूती ही अत्यंत महत्वाची गोष्ट असून, ती जगण्याला प्रत्यक्ष भिडल्याशिवाय आपल्याला चांगली कलाकृती निर्माण करता येत नाही, असेही ढोके यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी काही चित्रपटांचाही इतिहास सांगितला.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जग आनंदमय
साहित्याच्या निर्मितेचे मूळ प्रेम आहे. रवींद्रनाथ टागोर यांचेही साहित्य प्रामुख्याने आनंदमय आहे. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय साहित्यातही जग, प्रेममय, आनंदमय असल्याचे दिसून येत आहे, असेही ढोके यांनी सांगितले. तसेच कवितेला सरासरी ७२५ वर्षांची परंपरा असल्याचेही त्यांनी सांगितले.