भोकरदनला पुन्हा बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:56 AM2019-09-19T00:56:45+5:302019-09-19T00:57:07+5:30
पावसामुळे भोकरदन तालुक्यातील रायघोळ, केळणा नदीला पूर आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी रात्री व बुधवारी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भोकरदन तालुक्यातील रायघोळ, केळणा नदीलापूर आला होता. धामणा प्रकल्पाच्या क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने नदीपात्राचे पाणी शेतशिवारात शिरले आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने धामणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहरासह परिसरात काही काळ मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात १०.८२ मिमी पाऊस झाला. यात जालना तालुक्यात ५.७५ मिमी, बदनापूर ०.८० मिमी, भोकरदन २.६३ मिमी, जाफराबाद (निरंक), परतूर १७.६० मिमी, मंठा २.५० मिमी, अंबड ३४ मिमी तर घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी असून, आजवर ४१५.७८ मिमी पावसाची नोंद प्रशासन दप्तरी झाली आहे.
परतूर तालुका व परिसरात समाधानकारक पाऊस झाला. वालसावंगी, आष्टी, ढोणवाडी, आसनगाव, को. हादगाव, वाहेगावसह परिसरात पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. वालसावंगी परिसरात बुधवारी दुपारपर्यंत पाऊस झाला. येथील कवरलाल कोठारी यांच्या एका कापड दुकानाच्या गोडाऊनमध्ये पाणी घुसल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. आव्हाना परिसरातील शेतशिवारात पाणी घुसल्याने उडीद, मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्याच्या उत्तर भागातील जळगाव सपकाळ परिसरात पाऊस झाला. यामुळे धामणा धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाखालील नदीपात्राच्या काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पारध येथून वाहणाऱ्या रायघोळ नदीला पूर आला होता. गणेश नगर परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याशिवाय जालना शहरासह तालुक्यातील उटवद व परिसरातही बुधवारी पाऊस झाला. घनसावंगी भागातील रांजणी परिसरातही पावसाने हजेरी लावली.
धावडा : पावसाने दमदार हजेरी लावल्याने धावडा शिवारातील नदी-नाले तुडूंब वाहिले. गावातील मुख्य रस्त्यावर, चौका-चौकात पाणी साचले होते. गावच्या शिवारातील नदीच्या पुराचे पाणी मारूती मंदिरापर्यंत आले होते. यामुळे धावडा गाव व समतानगर भागाचा ८ तास संपर्क तुटला होता.
सुदैवाने पाऊस थांबल्याने मोठे नुकसान टळले. तर खारोनी नदीला आलेल्या पुरामुळे अजिंठा, धावडा ते बुलडाणा संपर्क तुटला होता. शेतशिवारात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
भोकरदन : अनेक गावांचा संपर्क तुटला
भोकरदन : तालुक्यातील केळना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरील पाण्यात गेलले दोघेजण वाहून जाता-जाता बालंबाल बचावले. पुलावरून पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.
या पुरामुळे आलापूर, गोकुळ प्रल्हादपूर वाडी आदी गावाचा संपर्क तुटला होता. नदीचे पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
वालसावंगी शाळेला सुटी
वालसावंगी : वालसावंगी परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. गावापासून एक किलोमीटर अंतरावर शाळा असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गावापर्यंत नेऊन सोडले. यासाठी अनिल बोराडे, सुभाष गवळी, विजय पाटील, सपकाळ, चव्हाण यांच्यासह पालक नारायण हिवाळे, सतीश तेलंग्रे, राम म्हस्के, समाधान वैद्य यांनी मोठे परिश्रम घेतले.