... तर मिळाली असती शंभर टक्के भरपाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:12 AM2018-02-13T01:12:42+5:302018-02-13T01:13:06+5:30
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे विमा काढून जिल्ह्याचे नाव देशभरात नेले. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला. मात्र, दोनच वर्षांत याकडे पाठ फिरवली आणि येथेच घात झाला. फळबाग व रबी हंगामासाठी शेतक-यांनी पीकविमा काढला असता तर विमा कंपनीकडून शंभर टक्के भरपाई मिळाली असती.
बाबासाहेब म्हस्के/जालना : दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे विमा काढून जिल्ह्याचे नाव देशभरात नेले. पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला. मात्र, दोनच वर्षांत याकडे पाठ फिरवली आणि येथेच घात झाला. फळबाग व रबी हंगामासाठी शेतक-यांनी पीकविमा काढला असता तर विमा कंपनीकडून शंभर टक्के भरपाई मिळाली असती. आता केवळ शासनाच्या मदतीवरच मदार आहे. जिल्ह्यात केवळ २२ हजार शेतकºयांनी रबी पीकविमा काढल्याचे समोर आले आहे. गारपिटीच्या घटनेने पीकविम्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
जालना जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जालना, मंठा, जाफराबाद, घनसावंगी, अंबड आणि परतूर तालुक्यातील हरभरा, गहू, ज्वारी, तूर, कांदा बियाणे या हंगामी पिकांसह द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील २२० गावांतील ३८ हजार ६४ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून, ते पूर्ण होण्यास किमान तीन ते चार दिवस लागतील. ज्या शेतकºयांनी रबी पीकविमा काढला आहे, त्यांना विमा कंपन्यांकडून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. तर ज्या शेतक-यांनी विमा काढलेला नाही, त्यांना शासनाकडून मदत मिळणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, ती किती व कधी मिळणार, हा प्रश्न आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे. मात्र, मदतीसाठी शासनस्तरावर अद्याप कुठल्याच हालचाली सुरू नाहीत. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत असेच झाले तर शेतक-यांना शासनाच्या मदतीची वाट पाहत राहावी लागेल. याउलट विमा काढलेल्या शेतक-यांना जोखीम रक्कम म्हणून विमा कंपनीकडून भरपाई मिळणार आहे. उत्पादन वाढीसाठी ज्या प्रमाणे बियाणे खरेदीपासून महागडी खते, औषधींवर मोठा खर्च केला जातो, त्याचप्रमाणे पिकांची सुरक्षा म्हणून मातीत स्वप्ने पेरणा-या बळीराजाने आता तरी पीकविमा काढण्यास प्राधान्य देणे यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. या रबी हंगामात केवळ २२ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला असून, यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकºयांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतक-यांची संख्या व रबीचे एकूण क्षेत्र पाहता हे प्रमाण खूपच कमी आहे.
---------------
आवाहनाकडे दुर्लक्ष
जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, थार आदी भागातील द्राक्ष बागायतदारांनी या वर्षी द्राक्ष बागांचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने वारंवार बैठका घेऊन केले होते. मात्र, बहुतांश शेतक-यांनी या भागात गारपीट होत नाही, असे म्हणत विमा काढण्याला प्राधान्य दिले नाही. याची मोठी किमंत शेतक-यांना मोजावी लागली.
....................................
गतवर्षी जिल्ह्याच्या काही भागांत शेतक-यांनी पीकविमा काढावा यासाठी जनजागृती करण्यात आली. शेतक-यांनी आता तरी उत्पादन वाढीसाठी केल्या जाणाºया खर्चाप्रमाणे पिकांची जोखीम म्हणून शेतक-यांनी पीकविमा काढून घेण्याची गरज आहे.
- दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना.
----------
गारपिटीमुळे तालुकानिहाय झालेले नुकसान
तालुका गावांचीसंख्या बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जालना ६२ १३२५७
जाफराबाद ४८ ९१७१
मंठा ४५ १२९६४
अंबड ५३ १७४०
घनसावंगी १२ ९३४