जायकवाडी- जालना शहर पाणीपुरवठा योजनेमुळे १८ गावांची भागली तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:48 PM2020-03-21T22:48:36+5:302020-03-21T22:50:03+5:30
जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये २५० कोटी रूपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. पैठण ते जालना हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या शंभर किलोमीटरमध्ये ही जलवाहिनी जवळपास १९ गावांमधून जाते. यामुळे या गवांना अर्धा इंच पाईपमधून पाणी देण्याची व्यवस्था जालना पालिकेने केल्याने या गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहराला पाणी समस्येने ग्रासले होते. मध्यंतरी विदर्भातील खडकपूर्णा धरणातून जलवाहिनी टाकून पाणी आणण्याच्या योजनेवर विचार झाला होता. परंतु तेथे जालन्यासाठी जे पाणी धरणात राखून ठेवावे लागते त्याचे आरक्षण नव्हते. त्यानंतर मग पैठण येथील जायकवाडी धरणाचा पर्याय समोर आला. त्यासाठी एका खाजगी सर्वेक्षण कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्या एजन्सीने जायकवाडी धरणातून पाणी आणतांना ते शिरनेर टेकडीपासून जालन्याला आणावे असा एक आणि नंतर अंबडहून हे पाणी जालन्यात नेता यईल असा अहवाल दिला होता. त्यामुळे अंबड येथून ही योजना आणण्याचे ठरले.
ही योजना आणताना पुन्हा पूर्वी प्रमाणेच अंबड शहराचा मुद्दा उपस्थित झाला. पूर्वी जालना शहराला शहागड योजनेतून जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा होत होता. तो आता जायकवाडी धरणातून होत आहे. अंबड पालिकेने पुन्हा या पाणी मिळण्याच्या मुद्द्यावर हक्क सांगितल्याने जालना पालिकेची डोकेदुखी कायम आहे. अंबडने वीजबिल आणि पाण्याचे बिल देणे अपेक्षित आहे. परंतु, त्याची पूर्तता होत नसल्याने जालन्याला मुबलक पाणी मिळणे अवघड होत आहे.