जालन्यातील ड्रायपोर्टचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:37 PM2020-01-16T19:37:00+5:302020-01-16T19:39:15+5:30
प्रकल्पासाठी जवळपास २०० कोटी रूपयांचा खर्च झाला असून आणखी १७० कोटी रुपयांची गरज आहे.
जालना : जालन्यातील ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी जवळपास २०० कोटी रूपयांचा खर्च झाला असून आणखी १७० कोटी रुपयांची गरज आहे. आगामी सहा महिन्यांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा आमचा दौरा असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
संजय सेठी यांच्यासह जेएनपीटीचे मुख्य अभियंता एस.व्ही. मदाभावी, सहायक प्रबंधक आर.बी. जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश निºहाळी यांनी सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी सेठी यांनी दानवे यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
या प्रकल्पासाठी दरेगाव, खादगाव या शिवारातील जवळपास ५०० एकर जागा संपादीत केली गेली. या जागेला सुरक्षा भिंत बांधून पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मालाची ने-आण रेल्वेने करणे सोयीचे व्हावे यासाठी दिनेगाव रेल्वे स्थानक आणि ड्रायपोर्टच्या जवळपास तीन किलोमीटर परिसरात स्वतंत्र रेल्वे ट्रॅक जेएनपीटीने बांधला आहे.
हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सेठी यांनी दिली. गेल्याच आठवड्यात रावसाहेब दानवे तसेच जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात कस्टम क्लिअरन्सचा मुद्दा निकाली काढण्यात आला. त्यामुळे जालन्यातूनच माल निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.