भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडून २७ कामगार भाजल्या प्रकरणी कंपनीच्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:46 PM2024-08-26T13:46:19+5:302024-08-26T13:50:30+5:30
जालन्याच्या स्टील कंपनीतील घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू; सुरक्षा व्यवस्था नसल्याने कामगार जखमी झाल्याची माहिती
जालना : येथील गजकेसरी स्टील कंपनीत शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात लोखंड वितळविणाऱ्या भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडल्याने २७ कामगार भाजले गेले होते. प्रकृती गंभीर असलेल्या सात जणांवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ४० वर्षीय कामगाराने उपचारादरम्यान रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. राम श्रेष्ठ भातुराम (४०) असे मयत कामगाराचे नाव आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीपासून ३० फूट लांब काम करणारे कामगारही जखमी झाले. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत कंपनीच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह तिघांना अटक केली आहे.
जालना येथील एमआयडीसी भागात गजकेसरी स्टील कंपनी असून, या कंपनीत शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना लोखंड वितळविणाऱ्या भट्टीत स्फोट झाला. तप्त लोहरस भट्टीजवळ काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडला. या घटनेत २७ जण जखमी झाले असून, सात गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
एका कामगाराने उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
या भीषण स्फोटात लोखंड वितळविणाऱ्या भट्टीतील तप्त लोहरस अंगावर पडल्याने गंभीर जखमी आणि भाजलेल्या ७ जणांना शनिवारी शहरातील बीड बायपासवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात राम श्रेष्ठ भातुराम हे ९८ टक्के भाजले होते. उपचार सुरू असताना सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅ. रमाकांत बेंबडे यांनी दिली.
अपघात प्रकरणी तिघांना अटक
जखमींपैकी मोहम्मद रफिकोद्दीन मोहम्मद अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात कलम भादंवि १०६,२८९,१२५अ,२२५ ब कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीपकुमार झा, भट्टी निरीक्षक किशोर राय आणि क्रेन ऑपरेटर लालसिंग प्रजापती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. दरम्यान तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती चंदनझिरा पोलिसांनी रविवार दिली.
हे कामगार झाले जखमी
या घटनेत रणजित प्रजापती, तुळशीराम दुर्वे, कृष्णा यादव, मंगरू व्हटके, रामदयाल धुर्वे, पित्वसू जैना हे सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर कांतिलाल ऊईने, सुनील उर्वा, सोनू ऊहाके, सुरज उर्व्हा, मनोजकुमार रॉय, अझरुद्दीन अन्सारी, महंमद रफिकोद्दीन महंमद उस्मान, शुभम रॉय, गुड्डू राम, मनोजकुमार, विशाल कुमार, अशोक रामप्रसाद व इतर कामगार जखमी झाले.
बिहार, उत्तर प्रदेशचे कामगार
स्फोटातील जखमींमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांची संख्या अधिक आहे. भट्टीजवळ काम करणाऱ्या या कामगारांसाठी कसलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समजते. सुरक्षा किट उपलब्ध असते तर कदाचित कामगार गंभीर जखमी झाले नसते, अशी तक्रार कामगार संघटनेने केली आहे.
कामगारांना आर्थिक मदत मिळावी
स्टील कंपनीतील भट्टीची वेळेवर देखभाल न केल्याने स्फोट होतो आणि लोहरस अंगावर पडून कामगार भाजतात. सुरक्षा किट असती तर कामगार जखमी झाले नसते. या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थापनावर प्रशासनाने कारवाई करावी आणि जखमींना आर्थिक मदत करावी.
-अण्णा सावंत, कामगार नेते