जालन्यात 'मविआ'चा जल्लोष; मतमोजणी केंद्राबाहेरून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा काढता पाय
By विजय मुंडे | Published: June 4, 2024 06:07 PM2024-06-04T18:07:00+5:302024-06-04T18:08:36+5:30
Jalana Lok Sabha Result 2024: कॉँग्रेसच्या डॉ. कल्याण काळेंना ५४ हजारांची लिड मिळाली
Jalana Lok Sabha Result 2024: जालना लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीतील १७ व्या फेरीअखेर मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ४ लाख १० हजार ५८० मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना ३ लाख ५६ हजार २२० मते मिळाली आहेत. डॉ. काळे यांना ५४ हजार ५३८ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे मविआच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष सुरू केला असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरातून काढता पाय घेतला होता.
जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. मतमोजणी अत्यंत कासवगतीने होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही फेरीनिहाय निकालासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत होती. पहिल्या तीन-चार फेरींमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कल्याण काळे यांना समसमान मते मिळत होती. परंतु, पाचव्या फेरीनंतर मविआचे डॉ. कल्याण काळे यांनी घेतलेली आघाडी १६ व्या फेरीपर्यंत कायम होती. १७ व्या फेरीअखेर डॉ. काळे यांना ४ लाख १० हजार ५८० मते मिळाली होती. तर दानवे यांना ३ लाख ५६ हजार २२० मते मिळाली होती. काळे यांनी ५४ हजार ५३८ मतांची आघाडी घेतल्यानंतरच काँग्रेस कार्यकर्त्यांसह मविआच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला.
साबळेंनी घेतली एक लाख मते
अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी १७ व्या फेरीअखेर तब्बल १ लाख १४ हजार ८४७ मते घेतली होती. वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले यांनी २४ हजार २०० मते घेतली होती. अपक्ष उमेदवार साबळे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेत प्रमुख उमेदवारांनाही धक्का दिला आहे.