जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:06 PM2024-06-04T20:06:25+5:302024-06-04T20:08:23+5:30
Jalana Lok Sabha Result 2024:केंद्रीय राज्यमंत्र्याच्या पराभवाने भाजपाला धक्का बसला आहे.
Jalana Lok Sabha Result 2024: जालना लोकसभेत मोठा उलटफेर झाला असून ३५ वर्षांपासूनचा भाजपा गड यावेळी ढासळला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी दारुण पराभव करत 'कांटे की टक्कर' जिंकली. काळे यांच्या विजयामुळे यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा' मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
१९८९ पासून जालना लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. त्यानंतर १९९१ च्या अंकुशराव टोपे यांच्या कॉग्रेसच्या विजयाचा अपवाद वगळता १९९६ पासून या मतदारसंघात कॉग्रेसला विजय मिळालेला नाही. काॅग्रेससाठी नेहमी पडणारी जागा, असा राजकीय इतिहास डॉ. काळे यांनी शानदार विजय मिळवत पुसून टाकला. रावसाहेब दानवे यांचे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळविण्याचे स्वप्न भंगले असून केंद्रीय राज्यमंत्र्याच्या पराभवाने भाजपाला धक्का बसला आहे.
पहिल्या तीन-चार फेरींमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कल्याण काळे यांना समसमान मते मिळत होती. परंतु, पाचव्या फेरीनंतर मविआचे डॉ. कल्याण काळे यांनी घेतलेली आघाडी १६ व्या फेरीपर्यंत कायम होती. डॉ. काळे यांना ५ लाख ८३ हजार ११२ मते मिळाली होती. तर दानवे यांना ४ लाख ८१ हजार ३९८ मते मिळाली होती. काळे यांनी १ लाख १ हजार ७१४ मतांची आघाडी घेत विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी १ लाख ४८ हजार ७३२ मते मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.