जालन्यात घमासान! सातव्या फेरीनंतर कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे; कार्यकर्त्यांमध्ये दावे-प्रतिदावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 14:04 IST2024-06-04T14:02:35+5:302024-06-04T14:04:19+5:30
रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोन उमेदवारामध्ये सरळ लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी देखील चांगलीच मते मिळवली आहेत.

जालन्यात घमासान! सातव्या फेरीनंतर कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे; कार्यकर्त्यांमध्ये दावे-प्रतिदावे
-शिवचरण वावळे
Jalana Lok Sabha Result 2024 : लोकसभा मतदारसंघांमध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यात काट्यावरची लढत सुरू आहे. भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी सातव्या फेरीत १ लाख ५३ हजार ६२४ तर कॉग्रेसचे कल्याण काळे यांना १ लाख ५८ हजार ६९५ मते मिळाली असून कल्याण काळे हे ५ हजार ७१ मताने पुढे आहेत.
सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाची तिरीप सुद्धा दिसली नव्हती. दुपारी १२ वाजेनंतर सूर्याने दर्शन घडवले आणि पुन्हा उन्हाचा पारा पुन्हा तापू लागला. तसा कार्यकर्त्यांची उत्सुकता अन् उत्साह शिगेला पोहोचताना दिसून येत होता. यातच कधी रावसाहेब दानवे पुढे तर कधी कल्याण काळे पुढे अशी मतांची आकडेवारी खाली वर होत आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये मात्र सहाव्या - सातव्या फेरीनंतर आपलाच उमेदवार 101% निवडून येणार असे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.
सोमवारी संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरण काही शितल झाले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी बारापर्यंत वातावरण थंड होते. मात्र मतमोजणीच्या फेऱ्या जशा वाढत होत्या तसे उन्ह देखील वाढत आहे. निकालाची उत्सुकता कायम असल्याने घामाघूम झाले तरी एकही कार्यकर्ता जागेवरून हटताना दिसला नाही.
रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोन उमेदवारामध्ये सरळ लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी देखील चांगलीच मते मिळवली आहेत. विशेष करून, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी सातव्या फेरीत 49 हजार 818 मते मिळवल्याने त्यांना मिळवलेली मते कुणाच्या पथ्यावर पडतील हे अंतिम फेरीपर्यंत स्पष्ट होईल.