तहसीलदारांच्या वाहनाला कार आडवी लावून हायवा पळविला
By दिपक ढोले | Published: March 17, 2023 09:08 PM2023-03-17T21:08:26+5:302023-03-17T21:08:36+5:30
याप्रकरणी शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : तहसीलदारांच्या वाहनाला कार आडवी लावून वाळू तस्करांनी हायवा पळविल्याची घटना जालना शहरातील निधोना रोडवरील साई सिटीजवळ गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा हायवा दिसल्याने तहसिलदार छाया पवार यांनी त्यांच्या वाहनातून हायवा चालकाचा पाठलाग सुरू केला. तहसीलदार पवार यांची गाडी मागे असल्याचे पाहून चालकाने हायवा सुसाट वेगाने पळविला. यानंतर तहसीलदारांच्या वाहनासमोर तीन जणांनी कार आडवी लावून कारवाई करण्यास प्रतिबंध केला.
नंतर हायवा ट्राॅली उघडी करुन वाळू रस्त्यावर सांडून देत हायवा घेऊन पळून गेला. तहसीलदारांनी संबंधित कारची माहिती काढून हायवामालकाची ओळख पटविली आहे. चार जणांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या टेंडर सुरू नसल्याने वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूलच्या पथकांकडून कारवाया केल्या जात आहेत, अशी माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली.