Jalana: मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
By दिपक ढोले | Published: August 17, 2023 08:40 PM2023-08-17T20:40:14+5:302023-08-17T20:41:01+5:30
Jalana News: मारहाण करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जालना - मारहाण करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रवि हिरालाल चौधरी (रा. म्हाडा कॉलनी, जालना) असे आरोपीचे नाव आहे. १५ मे २०२२ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी विनित कुलथे व सार्थक गाजरे हे दोघे घराजवळ बसले होते. त्याचवेळी आरोपी रवि चौधरी याने फिर्यादीचा मित्र सार्थक गाजरे याच्या पोटात चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आरोपीविरुध्द विनित कुलथे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जखमी साक्षीदार, डॉक्टर व इतर साक्षीदार तसेच तपासिक अंमलदार भगवान नरोडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व आलेल्या साक्षीपुराव्या वरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी आरोपी रवि हिरालाल चौधरी याला एक वर्षाची सक्त मजुरी आणि सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जखमीला नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. भारत खांडेकर यांनी काम पाहिले.