पोलिस अधीक्षक सक्तीच्या रजेवर, अपर पोलिस अधीक्षक, डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 03:27 PM2023-09-03T15:27:01+5:302023-09-03T15:27:20+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहेत. तसेच अपर पोलिस अधीक्षक राहूल खाडे आणि डीवायएसपी यांच्या बदली करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. ३१ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हवेत गोळीबारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून, अनेकठिकाणी जाळपोळ झाली. शिवाय, जालना शहरातही शनिवारी जाळपोळ झाली होती.
आंदोलनकांनी दगड फेक केली होती. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून, त्यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
लाठीचार्जची चौकशी करण्याचे आदेश
जालना येथील लाठीहल्लाप्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना यांच्यामार्फत केली जाणार आहे. ते जालना येथे जाऊन ही चौकशी करणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.