Jalana: दोन हजार ६५ आंदोलकांवर गुन्हे दाखल: १२ बोअर रायफलमधून हवेत गोळीबार
By दिपक ढोले | Published: September 3, 2023 05:02 PM2023-09-03T17:02:33+5:302023-09-03T17:03:06+5:30
Jalana: जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या जवळपास २ हजार ६५ आंदोलकांवर तालुका आणि कदीम पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जालना : जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या जवळपास २ हजार ६५ आंदोलकांवर तालुका आणि कदीम पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी पोलिसांनी जवळपास ४० जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी १२ बोअर रायफलमधून हवेत गोळीबार केला आहे. अंतरवाली सटारी येथे उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी जालना शहरातील अंबड चौफुली येथे शनिवारी आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाला काही वेळानंतर हिंसक वळण लागले. आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड करून पोलिसांवर दगडफेक केली. यात काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली. जवळपास साडेतीन तास पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक सुरू होती. आंदोलकांनी ट्रक चालक आणि क्लिनरला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय, ट्रक जाळून टाकले. काही वाहनांची तोडफोड देखील केली. शेवटी पोलिसांना १२ बोअर रायफलमधून हवेत गोळीबार करावा लागला. या प्रकरणी सुनिल गांगे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात संशयित मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, विश्वभर तिरूखे, देवकर्ण वाघ, राधाकिसन शिंदे, संदीप लांडगे यांच्यासह १५०० ते २ हजार जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कदीम जालना पोलिस ठाण्यात जवळपास ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या कलमांखाली गुन्हे दाखल
जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळोपाळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम ३५३, ३३२, ३३६, ३३७, ३४१,४३५,१४४,१४३, १४५, १४६, १४७, १४८,१४९,१०९, ११४ भादवीसह कलम १३५ मु.पो. कायदा, सहकलम -३ व ४ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम ७ क्रिमिनिल लॉ अमेन्टमेन्ट ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत २ हजार ९२६ जणांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी आतापर्यंत गोंदी पोलिस ठाण्यात ३६६, बस जाळल्या प्रकरणी गोंदी ठाण्यातच ५२ आणि ट्रक जाळल्या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २५०, बदनापूर येथे खासगी वाहन जाळल्या प्रकरणी ६५ आणि दगडफेक केल्या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन हजार, कदीम ठाण्यात ६५ असे एकूण २ हजार ९२६ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.