जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:52 PM2019-02-12T17:52:12+5:302019-02-12T17:58:51+5:30

शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय.

Jalana Water shortage is Man-Made; Hundreds of farmers' farming on stolen water! | जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

जालन्यावरील जलसंकट मानवनिर्मित; चोरीच्या पाण्यावर पोसतेय शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ! 

googlenewsNext
ठळक मुद्देव्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जाते

- संजय देशमुख 

जालना : स्टील आणि सीड्स उद्योगाबरोबर जालन्याचा पाणीप्रश्नही नेहमीच चर्चेत असतो. शहरावासीयांची वाढलेली तहान लक्षात घेऊन २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, शहराचा पिच्छा करणारे जलसंकट हे मानवनिर्मित असल्याचेच वारंवार समोर येतेय. जालन्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणण्यात आले. मात्र, पैठण ते  जालनादरम्यान  अंथरलेल्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह फोडून असंख्य ठिकाणी दरोडा टाकला जात आहे. याच चोरीच्या पाण्यावर जलवाहिनीजवळील ११० ते दीडशे एकर शेती पोसली जात असल्याचे भयावह वास्तव पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी तलाव हा वाढत्या लोकसंख्येपुढे अपुरा पडल्यामुळे १९८८ मध्ये जालना पालिकेने शहरागड येथे गोदावरीच्या पात्रात बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात पुढे पैठण येथील जायकवाडी धरणातून दर महिन्याला काही ठरावीक रक्कम भरून गोदावरीत पाणी सोडण्यात  येते. हे पाणी शहागडला येईपर्यंत भरपूर नासाडी होत होती. तेथून शहागड ते जालना अशी जवळपास ५० किलोमीटरची पाइपलाईन अंथरली. 

शहागड येथील पंपहाऊसद्वारे ते जालन्यापर्यंत आणले जायचे. परंतु या पाइपलाईनलाही परिसरातील शेतकऱ्यांनी भगदाड पाडून शेती फुलवली. तिच गत आता पैठण ते जालना या नव्याने  अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचीही झाली आहे. जालना पालिकेने केलेल्या पाहणीत हादरवून टाकणाऱ्या बाबी  समोर आल्या. १८ शेतकऱ्यांनी पाईलाईनवर डल्ला मारत शेती आणि फळबाग फुलवल्या आहेत. सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना पैठण ते पाचोड मार्गावरील शेती मात्र, हिरवीगार आहे. त्याचा शोध घेतल्यानंतर  जलवाहिनीला भगदाड पाडून पाण्याच्या चोरीचा गोरखधंदा उजेडात आला. 

शेतकऱ्यांवर गुन्हे 
जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून पाणी चोरी करणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी नगराध्यक्षा  संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. 

निवडणुकीच्या तयारीत समस्यांकडे दुर्लक्ष
लोकसभा निवडणुका दारावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जालना शहर राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे. आठ दिवसांच्या अंतराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यात येतात. परंतु पाणी, रस्ते तसेच दुष्काळावर ‘ब्र’ न काढता केवळ राजकीय समीकरणे जुळविताना दिसत आहेत. पुढाऱ्यांच्या ‘चलता है’ वृत्तीमुळे सर्वसामान्यांना जार आणि खासगी टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. एकूणच जालन्यात केवळ राजकीय फड रंगत असून, त्या फडापासून नागरी समस्या कोसोदूर आहेत. 

Web Title: Jalana Water shortage is Man-Made; Hundreds of farmers' farming on stolen water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.