जालना :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी १२६ जणांना झटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:41 AM2018-09-04T00:41:47+5:302018-09-04T00:42:20+5:30
वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद परिमंडळात पुन्हा धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात १२६ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
औरंगाबाद परिमंडळा अंतर्गत आता वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांनी दिली. गेल्याच आठवड्यात भरारी पथकाने जिल्ह्यात मोठी यशस्वी कारवाई केल्या नंतर पुन्हा एकदा वीज चोरांविरूध्द धडक मोहीम हाती घेतली आहे. वीज चोरी आणि विजेची गळती यामुळे जालना डी झोनमध्ये गेलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भारनियमन हे नित्याचीच बाब झाली आहे. हे थांबवून जे वीज ग्राहक नियमितपणे बिल भरतात, त्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीजेची थांबविणे हा एक महत्वाचा पर्याय असल्याचे हुमणे म्हणाले. जालना जिल्ह्यात वीज वितरणचे दोन विभाग पडतात. जालना -१ विभागात ३५ तर जालना-२ विभागामध्ये ९१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.
या ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरवायची आहेत.
मोहिमेत सातत्य राहणार
जालना जिल्हा हा वीजचोरीसाठी यापूर्वी पासूनच नावाजलेला आहे. भरारी पथकानेही अनेक धनदांडग्यांच्या वीजचोरीचा पर्दाफाश केल्याने आधीव खळबळ उडाली होती. आता पुन्हा या विशेष मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाले आहेत. एकूणच जे वीजचोरी करत असतील त्यांनी निदान आता तरी ती थांबवावी असे आवाहन अधीक्षक अभियंता हुमणे यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वीज चोरीची विशेष शोध मोहीम सुरू आहे. या अंतर्गत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट मुख्य वीज वाहिनीवरून आकडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकार जास्त घडत असल्याचे दिसून आले. हे आकडे जप्त केल्याने त्यांचा खच जमला आहे.