जालना : ‘त्या’ आॅडिओ क्लिपची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:21 AM2018-03-12T00:21:23+5:302018-03-12T00:21:32+5:30
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक सोडण्याच्या कारणावरून अंबड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांने उपनिरीक्षकावर टाकलेल्या दबावाच्या वादग्रस्त संवादाची आॅडिओ क्लिप व्हॉयरल झाली आहे. याची पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी गंभीर दखल घेतली असून, अप्पर अधीक्षकांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक सोडण्याच्या कारणावरून अंबड पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांने उपनिरीक्षकावर टाकलेल्या दबावाच्या वादग्रस्त संवादाची आॅडिओ क्लिप व्हॉयरल झाली आहे. याची पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी गंभीर दखल घेतली असून, अप्पर अधीक्षकांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रक पकडला होता. ठाणे डायरीत खाडाखोड करून पकडलेला ट्रक रात्रीतून सोडून देण्यात आला. त्यानंतर शनिवारी अंबड ठाण्याचे पोलीस निरीक्षक व ट्रक पकडणारे उपनिरीक्षक यांच्यात झालेल्या संवादाची आॅडिओ किल्प व्हॉयरल झली आहे. कुठलीही कारवाई न करता हा पडकडलेला ट्रक तात्काळ सोडून देण्यासाठी ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी उपनिरीक्षकांशी फोनवर संपर्क केला. तुम्ही माझ्यापेक्षा कनिष्ठ आहात. नोकरीत दोनच वर्ष झाले. मला शिकवू नका, ती मीटरमधील गाडी आहे.वाळूचा ट्रक तात्काळ सोडून द्या, तुम्हाला पैसे हवेत का, किती पैसे हवेत, अशा प्रकारच्या संवादाची आॅडिओ किल्प वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हॉयरल झाली आहे. यामुळे पोलीस दलाच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाल्याने पोलीस अधीक्षक पोकळे यांनी रविवारी अप्पर अधीक्षक लता फड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
अवैध वाळू वाहतूक : यापूर्वीही झाली होती तक्रार
काही महिन्यांपूर्वी भोकरदनच्या तहसीलदारांनी पोलीस अधिकारी वाहू माफियांवरील कारवाईस सहकार्य करत नसल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली होती.या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आॅडिओ क्लिप संवादाच्या चौकशीचे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
तर फॉरेन्सिक तपासणी
अप्पर पोलीस अधीक्षक फड यांना विचारले असता, सदर प्रकरणाची चौकशी करताना दोन्ही अधिकाºयांचे जबाब नोंदविले जाईल. त्यांनी आॅडिओ क्लिपमधील संवाद या अधिकाºयांचाच आहे का हे तपासले जाईल. अधिकाºयांनी याबाबत कबुली न दिल्यास संवादाची क्लिप फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठवली जाईल, असे त्यांनी सांगितले.