जालन्यात आघाडीसमोर युतीचे कडवे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:04 AM2019-07-15T06:04:01+5:302019-07-15T06:04:37+5:30
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीने मोेठे आव्हान निर्माण केले आहे.
- संजय देशमुख
जालना : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीने मोेठे आव्हान निर्माण केले आहे. आज घडीला काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे हे एकमेव आमदार आहेत. दुसरीकडे भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक आमदार आहेत. पैकी बबनराव लोणीकर (भाजप) आणि अर्जुन खोतकर (शिवसेना) हे मंत्री आहेत.
पाच विधानसभा मतदारसंघांत भोकरदनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार असून, परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे विजयी झाले आहेत. बदनापूर या राखीव मतदारसंघातून आ. नारायण कुचे हे नेतृत्व करत आहेत. २०१४ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. जालना विधानसभा वगळता त्यांना कुठेच यश मिळाले नाही. त्यातही अर्जुन खोतकर हे केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते.
यंदा मात्र, चित्र वेगळे राहणार आहे. भाजप-शिवसेनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपकडील बदनापूर मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळावा म्हणून अर्जुन खोतकर तसेच माजी आ. संतोष सांबरे मातोश्रीवर आतापासून संपर्क ठेवून आहेत. तर भाजप हा त्यांच्या विद्यमान आमदाराचा मतदारसंघ सेनेला एवढ्या सहजासहजी सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या जागेवरून युतीत मतभेद होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे घनसावंगी मतदारसंघातून यंदा शिवसेनेकडून प्रशासकीय सेवेत राहिलेले आणि आता बांधकाम व्यवसासायिक असलेले टोपे यांचे परंपरागत विरोधक हिकमत उढाण हे शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघातही मोठी चुरस निर्माण होणार आहे. राजेश टोपे यांचे वडील आणि माजी खासदार अंकुशराव टोपे यांचे २०१५ मध्ये निधन झाले. त्यांची मोठी पकड अंबड आणि घनसांगी मतदारसंघात होती. आता ते नसल्याने टोपे यांना निवडून येण्यासाठी अधिकचे परिश्रम घ्यावे लागतील.
जालना तसेच परतूर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. लोणीकरांना परतूर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांचे तगडे आव्हान असून, खोतकरांना काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल चांगली टक्कर देतील. गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता जालनाच्या नगराध्यक्षा असून, पालिकेत सत्ताही काँगे्रसची सत्ता आहे.
भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटलेला असून, तेथे माजी आ. चंद्रकांत दानवे हे दोन वेळेस निवडून आले होते. तेच यंदा पुन्हा रिंगणात राहतील. त्यामुळे या मतदारसंघात दानवे विरूद्ध दानवे अशी लढत होणार आहे.
>पक्षीय बलाबल
भाजप ०३ । शिवसेना ०१
राष्ट्रवादी ०१ । एकूण जागा-५
>सर्वात मोठा विजय घनसावंगी राजेश टोपे (राष्ट्रवादी) ९८ हजार ३०
(पराभूत- विलास खरात, भाजपा)
>सर्वात कमी मताधिक्याने पराभव जालना- कैलास गोरंट्याल (काँगे्रस- मते २९६)
(विजयी- अर्जुन खोतकर, शिवसेना,)
>वंचितची धास्ती कायम
बहुजन वंचित आघाडी काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अनेकजण वंचित आघाडीकडून रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे प्रस्थापितांचे वंचित आघाडीकडे चातक पक्ष्याप्रमाणे लक्ष लागून आहे.