मोर्चा, घोषणाबाजींनी दणाणले जालना शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:00 IST2020-01-09T00:59:19+5:302020-01-09T01:00:03+5:30
शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलल्या निदर्शनात देण्यात आलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.

मोर्चा, घोषणाबाजींनी दणाणले जालना शहर
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध मागण्यांसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामध्येकामगार, महसूल, महावितरणसह विविध शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग नोंदविला. यानिमित्त शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलल्या निदर्शनात देण्यात आलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शहरातील गांधी चमन भागातून बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. विविध मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. सर्व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरमहा २१ हजार रूपये द्यावे, कंत्राटीकरण बंद करावे, स्थानिक उद्योगामध्ये ८० टक्के स्थानिक तरूणांना काम द्यावे इ. विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांमार्फत शासनाला दिले. या मोर्चात सिटूचे राज्य सचिव अण्णा सावंत, मधुकर मोकळे, आयटकचे देविदास जिगे, इंटकचे राधेश्याम जैस्वाल, विश्वेश्वर स्वामी आदींनी मार्गदशन केले. यावेळी गोविंद अरदड, डॉ. सुनंदा तिडके, देविदास जिगे, बाबूराव कावळे, कृष्णा बाविस्कर, सुभाष मोहिते, अनिल मिसाळ, शिवनाथ खरात, मदन एखंडे, कल्पना अरदड, कांता मिटकरी, साजेदा बेगम, चंद्रकला पोपटे यांच्यासह इतरांचा सहभाग होता. यावेळी पोलिसांनी शहरासह परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.
राज्य सरकारी कर्मचारी संघटना
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनीही संपात सहभाग घेतला होता. यावेळी विविध मागण्यांसाठी व शासन धोरणाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना दिले.
यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे, सचिव संजय चंदन, व्ही.डी. म्हस्के, राजू निहाळ, तलाठी संघटनेचे अध्यक्ष व्ही.एन.भोरे, सचिव गणेश कुलकर्णी, रा.स.क़म. संघटनेचे पी. बी.मते, याह्या पठाण, एन.मो.चंद्रहास, जि.प.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पवार, कृषी सहायक संघटनेचे शिवाजी कोरडे, चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे आर.एस.रसाळ आदींची उपस्थिती होती.
भीमसेना
पँथर्स पार्टी
केंद्र शासनाने लागू केलेला एनआरसी व सीएए कायदा तात्काळ रद्द करावा, यासह इतर मागण्यांचे निवेदन भीमसेना पँथर्स पार्टीच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी अॅड. शिवाजी आदमाने, अॅड. बी.एम.साळवे, अशोक साबळे, किशोर मघाडे, मधुकर घेवंदे, राजेंद्र हिवाळे, प्रा. हर्षकुमार गायकवाड, एम.यू.पठाण यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
वीज उद्योग संयुक्त कृती समिती
वीज उद्योग संयुक्त कृती समितीच्या वतीनेही शासन धोरणाच्या विरोधात व विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. इंजिनिअर्स व कामगार संघटनांबरोबर वीज कायदा २०१८ बद्दल वाटाघाटी करा, व अंमलबजावणी थांबवा, महावितरणचे पुन्हा दोन कंपन्यांत विभाजनाला व लेटर आॅफ कन्सेंटला विरोध, विभाजन झालेल्या वीज उद्योगाचे पुन्हा केरळ व हिमाचल प्रमाणे एकत्रीकरण करावे इ. विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
संपक-यांच्या या आहेत प्रमुख मागण्या
जिल्हा रुग्णालयातील संघटनांचे पदाधिकारी, सदस्यही विविध मागण्यांसाठी या संपात सहभागी झाले होते. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतनत्रुटींचे तातडीने निवारण करावे, बक्षी समिती खंड दोन प्रसिध्द करावा, रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
संघटनेच्या पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले. तसेच विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला होता. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाºयांच्या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. यावेळी परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा अनिता भालतिलक, कविता वाघमारे, सचिन उगले, गजानन काळे, पाटील, मच्छिंद्र वाहूळकर, लक्ष्मण बावस्कर, दीपक भाले, गजानन शिंगणे, सुरेश टोले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याशिवाय इतर शासकीय, निमशासकीय संघटनांनीही या संपामध्ये सहभाग नोंदविला. यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णत: ठप्प झाले होते. सर्वसामान्यांची अनेक कामेही रखडली होती.