जालना जिल्ह्यात २०५२ मोबाईलधारक करतात आरोग्य सेतू ॲपचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 07:10 PM2020-11-27T19:10:14+5:302020-11-27T19:11:15+5:30
भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांपैकी आरोग्य सेतू अॅप महत्त्वाचे आहे.
जालना : जिल्ह्यातील २ हजार ५२ मोबाईलधारक आरोग्य सेतू ॲपचा वापर करतात. या मोबाईलधारकांची आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला विचारपूस केली जाते.
भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांपैकी आरोग्य सेतू अॅप महत्त्वाचे आहे. आरोग्य सेतू अॅपमध्ये मोबाईल ब्लूटूथ आणि लोकेशन यांच्या मदतीने एखादी व्यक्ती गेल्या काही दिवसात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती का, याचा अलर्ट मिळतो. यासाठी कोविड-१९ चाचणी झालेल्या रुग्णांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. हा डेटाबेस स्कॅन करून हा अलर्ट दिला जातो. जिल्हा प्रशासनालाही ॲपची चांगलीच मदत झाली आहे. ज्या व्यक्तींनी ॲप डाऊनलोड केले आहे. त्यांना ॲपच्या माध्यमातून शोधले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश
जर एखाद्या ॲप युजरला कोरोनाची लक्षणे दिसली किंवा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या आरोग्य सेतू युजरला अलर्ट केले जाते. हे ॲप आपल्याला हेदेखील सांगेल की तुम्ही ज्या भागात आहात तो भाग कोणत्या कोरोनाच्या झोनमध्ये आहे. जर तुम्ही हाय रिस्क झोनमध्ये असाल तर ती माहितीही ॲपद्वारे मिळते. एवढेच नाही तर तुम्हाला टेस्ट करण्यासही सांगते. या ॲपमुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
आरोग्य सेतू ॲपमुळे प्रशासनाला मदत झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास २०५२ जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात ॲप युजर असेल त्याला शोधण्यास मदत झाली.
- विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी