जालना जिल्ह्यात १० कुष्ठ, ४२ क्षयरोग रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:48 AM2019-09-27T00:48:46+5:302019-09-27T00:49:43+5:30
सर्वेक्षणात आतापर्यंत १० कुष्ठरोग तर ४२ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संयुक्त कुष्ठ रुग्ण, सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू असून, या सर्वेक्षणात आतापर्यंत १० कुष्ठरोग तर ४२ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात संयुक्त कुष्ठ रुग्ण, क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी १३ सप्टेंबरपासून सर्वेक्षण सुरु असून, २८ सप्टेंबरपर्यंत ते चालणार आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील १८ लाख २८ हजार १४० नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
आशा सेविकांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन नमुने घेण्यात येत आहेत. कुष्ठ रुग्णांच्या शोधासाठी त्वचेचे; तसेच इतर नमुने घेतले जात आहेत. क्षयरोगासाठी थुंकीचे नमुने तपासले जात असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली.
आतापर्यंतच्या सर्वेक्षणात कुष्ठरोगाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार त्यांना औषधोपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. क्षयरोगाचे आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुण्यात जवळपास ४२ रुग्ण आढळले आहे. हे सर्वेक्षण १ आॅक्टोबरपर्यंत चालणार असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.
ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कडले, क्षयरोग अधिकारी जायभाय करीत आहेत.
कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरूकता अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात १८ लाख २८ हजार १३० नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ लाख १७ हजार ७५२ नागरिकांची तपासणी झाली आहे. यात ३ हजार ४६ संशयित कुष्ठरुग्ण रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० रुग्ण बाधित आहेत तर क्षयरोगाचे ८८९ एवढे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे.