तीन तलाक प्रकरणी जालना जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:16 AM2019-10-27T00:16:07+5:302019-10-27T00:16:40+5:30
ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी माहेरच्यांकडून तीन लाख रुपये न आणल्याने एका महिलेला तीन वेळेस तलाक..तलाक़.तलाक म्हणत तलाक देण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी माहेरच्यांकडून तीन लाख रुपये न आणल्याने एका महिलेला तीन वेळेस तलाक..तलाक़.तलाक म्हणत तलाक देण्यात आला. या प्रकरणी केंद्र शासनाच्या नवीन कायद्याप्रमाणे कदीम पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
पती नवाब खान चंद खान पठाण, दीर फिरोज खान पठाण, नणंद मुमाताज पठाण (रा. भोईपुरा), कौसर पठाण, जीनत सय्यद, शामीम सय्यद (तिघे रा. हर्सूल सावंगी, औरंगाबाद) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नवाब खान चंद खान पठाण याचा जालना येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी नवाब खान चंद खान पठाण याने पत्नीला माहेरून ३ लाख रुपये आणण्यास सांगितले. परंतु, माहेरच्यांकडून पत्नीने पैसे न आणल्याने चिडून जाऊन तिला सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर नवाब खान चंद खान पठाण याने तीन वेळेस तलाक... तलाक... म्हणत तलाक दिला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बाबासाहेब रेगे यांनी दिली. या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक केली नसल्याचेही कदीम पोलिसांनी सांगितले.