जालना जिल्ह्यात ३४ टक्केच पशुगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:26 AM2019-03-23T00:26:44+5:302019-03-23T00:27:38+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पशुगणना करण्याचे काम पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती. परंतु, सध्या केवळ ३४ टक्केच पशूंची गणना झालेली आहे. दरम्यान, निवडणूक व तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना संथगतीने सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पशुगणना करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले. यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन दिली होती.
पशुगणना करण्यासाठी १०७ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे प्रगणक घरोघरी जाऊन जनावरांची माहिती गोळा करीत आहेत. ग्रामीण भागातील ३ लाख २० हजार ९०८ कुटुंबांपैकी १ लाख २४ हजार ४४५ कुटुंबांना प्रगणकांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर शहरी भागातील ७४ हजार ७१३ कुटुंबांपैकी १२ हजार ६४३ कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आलेली आहे.
दरम्यान, मार्च महिना संपत आला आहे. सरकारने दिलेली डेडलाईनही काही दिवसांतच संपणार आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील पशुगणना पुर्ण झालेली नाही. आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पशूंची गणना करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण दुष्काळाचा कसा सामना करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गणना बंद : कर्मचारी निवडणुकीच्या कामात
लोकसभेच्या निवडणूका असल्यामुळे पशुसंवर्धन विभागातील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. त्यामुळे सध्या तरी पशुगणना होत नसल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
इंटरनेट नसल्याने अडचणी
पशुगणना ही आॅनलाईन झाली असून, यासाठी आॅनलाईन माहिती भरावी लागत आहे. परंतु, अनेक गावांमध्ये नेट चालत नसल्याने प्रगणकांना अडचणी येत आहे. त्यामुळे प्रगणकांना नाईलाजाने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन माहिती भरावी लागत आहे.