जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:41 AM2018-07-07T00:41:27+5:302018-07-07T00:42:37+5:30
राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहीमे अंतर्गत जालना जिल्ह्याला ३७ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. गेल्या आठवडाभरात जालना जिल्ह्यात साडेतीन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाचे एकनाथ कान्हेरे यांनी दिली.
जालना जिल्ह्याला ३७ लाखाचे उद्दिष्ट दिले असून, त्यात ग्रामपंचायतींना ८ लाख ४९ हजार, बांधकाम विभाग ३४ हजार, सामाजिक वनिकरण सहा लाख, वन विभाग साडेचार लाख, ग्रामीण विकास यंत्रणा दोन लाख, कृषी विभाग पाच लाख, पोलीस यंत्रणा १९ हजार, वीज वितरण, जलसंघारण असे अनुक्रमे सात ते आठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण ८६ रोपवाटीका असून, त्यांच्याकडे ५० लाखापेक्षा अधिकची विविध प्रजातींची रोपे उपलब्ध असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हाभरात ३७ लाख लहानमोठी खड्डे खोदण्यात आले असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख वृक्ष लागवड पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, वसनसरंक्षक अधिकारी शिंदे आदी लक्ष ठेवून असल्याचे एकनाथ कान्हेरे म्हणाले. रोपवाटीकेतून यंदा जिल्ह्यात विक्रमी रोपांची निर्मिती व संगोपन करण्यात आले असून, पुढीलवर्षी देखील रोपांची चणचण भासणार नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच सध्या विविध शासकीय कार्यालयात वृक्ष लागवडी अंतर्गत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकडूनही वृक्ष लागवडीचे काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जालना : हरित सेनेचे ५६ हजार सदस्य
जालना जिल्ह्यात हरितसेनेचे सदस्य करून घेण्यासाठी एक लाख सदस्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आता पर्यंत जवळपास ५६ हजार नागरिकांनी हरित सेनेत सहभागासाठी नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आली. या हरित सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष लागवडीसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
१ ते ३१ जुलै दरम्यान ही विशेष वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रोपांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांचे शेत अथवा घर तसेच शासकीय कार्यालय असल्यास त्या वृक्षांची संगोपनाची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भविष्यात याचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे उपकग्रहामार्फत करण्यात येणार आहे.