जालना जिल्ह्यातील आरोग्य विभाग सलाईनवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:27 AM2019-09-08T00:27:30+5:302019-09-08T00:27:54+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयातील वर्ग एक ते तीनची तब्बल १२२ पदे रिक्त आहेत
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्याच्या आरोग्याचा भार असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयातील वर्ग एक ते तीनची तब्बल १२२ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवाच सलाईनवर आली असून, याचा रूग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यात केंद्र, राज्यात सत्ता असलेल्या पक्षातील मातब्बर मंत्री आहेत. विरोधी बाकावर बसणारे तगडे विरोधकही आहेत. राज्य, केंद्राच्या पटलावर राजकीय वजन असले तरी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या आरोग्य विभागातील मुलभूत सोयी-सुविधांसह रिक्तपदांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.
विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर आरोग्याची सेवा देणाºया ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयासह जिल्हा रूग्णालयातील रिक्तपदांचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर रूग्णसेवेचा भार पडला असून, याचा परिणामही रूग्णसेवेवर झाल्याचे दिसून येते.
जालना सामान्य रूग्णालयातील वर्ग एकची १२ तर इतर ठिकाणची ७ अशी एकूण १९ पदे रिक्त आहेत. वर्ग एकची अर्ध्याहून अधिक पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजाचे नियोजन करताना वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागते. जिल्हा रूग्णालयातील वर्ग दोनची ३ पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागाचा भार असलेल्या ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयातील वर्ग दोनची टेंभुर्णी ग्रामीण रूग्णालयातील एक, घनसावंगी ग्रामीण रूग्णालयातील मंजूर ८ पैकी ५ व राजूर गणपती येथील वर्ग एकची २ पदे रिक्त
आहेत.
सामान्य रूग्णालयात वर्ग तीन ची १९३ पदे मंजूर आहेत. पैकी ४५ पदे रिक्त आहेत. तर नेत्रचिकित्सा अधिकारी, कुशल कारागीर, कार्यदेशक ही पदेही रिक्त आहेत. स्त्री रूग्णालयातील वर्ग तीनची ६ पदे रिक्त आहेत. अंबड उपल्हिा रूग्णालयातील ४, परतूर ग्रामीण रूग्णालयातील २, भोकरदन ग्रामीण रूग्णालयातील ४, जाफराबाद ग्रामीण रूग्णालयातील ५, टेंभुर्णी येथील ५, मंठा येथील ३, नेर २, घनसावंगी ३, राजूर ग्रामीण रूग्णालयातील ३ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग चारचीही अनेक पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून, ही रिक्तपदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
रूग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सुरू असलेल्या ट्रॉमा केअर युनिटलाही रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. मंठा येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये मंजूर ५ पैकी २ पदे रिक्त आहेत. घनसावंगी येथील युनिटमध्ये मंजूर ५ पैकी २ पदे रिक्त आहेत.
जिल्हा क्षयरोग केंद्रही आजारी
जिल्हा क्षयरोग केंद्रात १४ पदे मंजूर आहेत. पैकी ४ पदे रिक्त आहेत. विशेषत: वर्ग तीनच्या अधिपिरिचारिकेची तिन्ही पदे रिक्त असल्याने रूग्णसेवेवर परिणाम झाला आहे.